चंद्रपूर - पिकअप वाहनाला एक विशेष बाक्स बनवून दारू तस्करी करीत असल्याचा प्रकार गोंडपिपरी येथे उघडकीस आला आहे. पोलिसांनी जवळपास २६ हजार रुपयांचा दारूसाठा आणि ३ लाख रुपयांचे वाहन जप्त केले आहे. या प्रकरणी आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बल्लारपूर तालुक्यातील आमडी येथील मधुकर रोहणकर याचा डेकोरेशनचा व्यवसाय आहे. तो गोंडपिपरी तालुक्यातील नंदवर्धन नदीघाटावरून पिकअपने दारूतस्करी करीत असल्याचा सुगावा पोलिसांना लागला. गोंडपिपरीचे ठाणेदार संदीप धोबे यांनी सापळा रचून नंदवर्धन घाटावरून येत असलेल्या पिकअपला थांबविले. वाहनाची तपासणी केली असता सुरुवातीला काहीच सापडले नाही. मात्र, पोलिसांनी कसून चैकशी केली असता पिकअपमध्ये दारू तस्करीसाठी एक विशेष बॉक्स असून त्यात दारूसाठा आढळून आला. त्यामध्ये दारूच्या १०८ बाटल्या, असा २६ हजार रुपयांचा दारूसाठा जप्त करण्यात आला. यासोबत ३ लाख रुपये किमतीचे पिकअप वाहनही पकडण्यात आले. आरोपींविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास ठाणेदार संदीप ढोबे यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे.