चिमूर (चंद्रपूर)- कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव राज्यात दिवसेंदिवस वाढत आहे. यावर प्रतिबंध करण्याकरीता राज्यातील सर्वच जिल्ह्याच्या सीमा सील करण्यात आल्या आहेत. असे असतानाही अवैध दारू विक्री सुरूच असल्याचे आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष यांनी पालकमंत्री, जिल्हाधिकारी तथा पोलीस अधिक्षक यांना तहसीलदार चिमूर यांचे मार्फत दिलेल्या निवेदनातून केले आहे. ही अवैध दारूविक्री व वाहतूक थांबविण्याची मागणीही निवेदनातून केली आहे.
जगभरात कोरोना विषाणूने थैमान घातले आहे. देशात व राज्यातही बाधितांची संख्या दिवसाघडी वाढतच आहे. कोरोना विषाणुचा संसर्ग रोखण्याकरीता लॉकडाऊन घोषीत करण्यात आले. राज्यातील सर्व जिल्ह्यांच्या सीमा बंद करण्यात आल्या आहेत. चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी असतानाही मागील सहा वर्षापासुन अवैध दारू विक्री व वाहतुक मोठ्या प्रमाणात सुरू होती. लॉकडाऊन काळात सीमा बंद केल्याने अवैध दारू विक्री व वाहतूक सुरूच आहे.
जिल्ह्यात कोरोनाचा एकही रुग्ण आढळलेला नाही. मात्र, अशाप्रकारे गाफील राहील्यास कोरोना विषाणुला आमंत्रण होईल. म्हणून सीमा बंदीची कठोर अंमलबजाणी करून अवैध दारू विक्री व वाहतुक थांबविण्यात यावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली. शेतकरी मालाची खरेदी विक्री या लॉकडाऊन मुळे प्रभावीत झालेली आहे. या काळात शेती माल विक्रीमधुनच पुढील शेती हंगामाचे नियोजन करण्यात येते. मात्र, सध्यस्थितीत असलेल्या निर्बंधाने शेतकरी चिंतातुर झालेला आहे. जिल्ह्यात रुग्ण नसल्याने शेतीमाल खरेदी-विक्री करीता थोडी शिथिलता दिल्यास शेतकऱ्यांचा फायदा होईल, याबद्दल विचार करून निर्णय घेण्याची मागणी मनसे उपजिल्हा प्रमूख प्रंशात कोल्हे यांनी पालकमंत्री, जिल्हाधिकारी व पोलीस अधिक्षक यांना तहसीलदार यांचे मार्फत दिलेल्या निवेदनातून केले आहे.