चंद्रपूर - जिल्ह्याची दारूबंदी ही सपशेल अपयशी ठरली. त्यामुळे ती लवकरच हटविण्यात येणार आहे. सध्या टाळेबंदी सुरू आहे. ती हटली तर लवकरच शासन दारूबंदी हटविण्याचा निर्णय घेईल, असे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी स्पष्ट केले.
...म्हणून दारूतस्करीच्या कारवाईत वाढ -
दारूतस्करीविरोधात आता पोलीस विभागाच्या कारवाया वाढल्या आहेत. यासाठीचे कडक निर्देश देत वडेट्टीवार यांनी याविरोधात कडक कारवाई करण्याचे आदेश दिले. त्यानुसार आता कारवाईचा सपाटा सुरू झाला आहे. यादरम्यान तब्बल सात कोटींची दारू पोलिसांनी जप्त केल्याची माहिती वडेट्टीवारांनी दिली. मात्र, ही दारूबंदी यशस्वी होताना दिसत नाही, असेही ते म्हणाले.
रखडलेल्या विकासाला ग्रामसभेच्या माध्यमातून मिळणार चालना -
कोरोनाचा विकासकामांना मोठा फटका बसला आहे. त्यातही ग्रामीण भागातील अनेक विकासकामे खोळंबलेली आहेत. ही मरगळ दूर करण्याच्या प्रयत्नात राज्य शासन आहे. त्यामुळे आता ग्रामसभा आणि आमसभा सुरू करण्याची मुभा लवकरच मिळणार आहे. त्यामाध्यमातून ग्रामविकास आणि रोजगार उपलब्ध होणार आहेत. याबाबतची माहिती राज्याचे मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली.
ग्रामपंचायत ही स्वायत्त संस्था आहे. त्यात ग्रामसभा आणि आमसभा या सर्वोच्च असतात. मात्र, कोरोनाच्या काळात त्या बंद आहेत आणि म्हणूनच तेथील विकासकामे देखील खोळंबलेली आहेत. ही स्थिती लक्षात घेता शासनाने त्या सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. अर्थातच, यासाठी कोरोनाच्या निर्देशांचे काटेकोरपणे पालन करणे बंधनकारक आहे, असे वडेट्टीवार म्हणाले.