चंद्रपूर - जगप्रसिद्ध ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात पर्यटकांची गर्दी असते. हा प्रकल्प नेहमी हाऊसफुल्ल असतो. याचाच फायदा घेऊन काही लोक वनकर्मचाऱ्यांशी संगनमत करून पर्यटकांना अवैधरित्या प्रवेश मिळवून ताडोबाची जंगल सफारी घडवितात. पर्यटकांकडून ज्यादा पैसे वसूल करतात. असाच प्रकार ताडोबाचे क्षेत्र संचालक जितेंद्र रामगावकर यांच्या निदर्शनास आला.
हेही वाचा - इंडोनेशियात कोरोनाच्या संसर्गाने 180 डॉक्टरांचा मृत्यू
ताडोबातील कोअर झोनच्या नवेगाव प्रवेशद्वारातून कुठलीही बुकिंग न करता अवैधरित्या वाहन सोडत असल्याची माहिती मिळाली. वनरक्षक टेकचंद सोनूले हा त्यात सहभागी असल्याची ती माहिती होती. एजंट सचिन कोयचाडे हा पर्यटकांना कोअर झोनच्या सफारीचे बुकींग न करता भ्रमंती करण्याचे आमिष द्यायचा. त्यामुळे ताडोबाची भुरळ पडलेले अनेक पर्यटक त्याच्याकडे आकर्षित व्हायचे. एक वाहन सोडण्याचे तो तब्बल 9 हजार घ्यायचा. वनरक्षक सोनूले याच्याशी त्याचे संगनमत होते. सोनूले याच्याकडे गाड्यांची बुकिंग तपासून त्यांना आत प्रवेश देण्याचे काम होते. मात्र कोयचाडे प्रकरणात तो वाहनाची कुठलीही नोंद न करता प्रवेश द्यायचा. याचा त्यालाही आर्थिक वाटा मिळायचा. 1 डिसेंबरला या प्रवेशद्वाराला ताडोबाच्या पथकाने भेट दिली. यावेळी सोनूले आणि कोयचाडे यांचा गौडबंगाल निदर्शनास आला. चौकशी केली असता हा प्रकार गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असल्याची कबुली आरोपींनी दिली.
हेही वाचा - फायजर बायोटेक : इंग्लंडमध्ये पुढील आठवड्यात लस होणार उपलब्ध, सरकारची मंजूरी
या गोरखधंद्याची तक्रार चिमुर पोलिसात नोंदवली गेली असून चिमूर पोलिसांनी वनरक्षक टेकचंद सोनुले व खडसंगी येथील दलाल सचिन कोयचाडे यांना ताब्यात घेतले. उशिरा त्यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून. याप्रकरणी वनरक्षक सोनुले यांच्यावर कायमस्वरूपी निलंबनाची कार्यवाही केली जाण्याची शक्यता वनविभागा तर्फे व्यक्त केली जात आहे. तसेच या प्रकरणात आणखी काहींचा सहभाग असण्याची दाट शक्यता आहे आहे. घटनेचा तपास चिमूर पोलिस करीत आहेत.