चंद्रपूर - कामगार भरती प्रकरणी चंद्रपूर वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. मोरे यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात आले आहेत. कामगार भरती प्रक्रियेत सर्व नियम धाब्यावर बसवत त्यांनी भ्रष्टाचार केला. मात्र, त्यांच्या भ्रष्टाचाराला शासन पाठीशी घालण्याचे काम करीत आहे, असा आरोप जन विकास सेनेचे संस्थापक-अध्यक्ष पप्पू देशमुख यांनी पत्रकार परिषदेत केला.
चंद्रपूर वैद्यकीय महाविद्यालयात कंत्राटी कामगारांच्या भरती प्रक्रियेत मोठा घोळ करण्यात आला. जुना करार रद्द झाल्याने कामगार भरती करण्याचे कंत्राट इंटरनॅशनल सेक्युरिटी आणि अभिजित सेक्युरिटी या कंपन्यांना देण्यात आले. कामगार कायद्यानुसार कंपनी कुठलीही असली तरी यात पूर्वी असलेल्या कामगारांना घ्यावे लागते. मात्र, नवीन कामगार भरती करण्याच्या हेतूने याची निविदा काढण्यात आली. त्यातही निविदेची वैधता ही सहा माहिनेच असते. मात्र, एप्रिल २०१८ मध्ये काढलेल्या निविदेला एक वर्ष पूर्ण झाल्यावरही त्याची वैधता कायम मानत पुढील औपचारिकता पार पाडण्यात आल्याचे देशमुख म्हणाले.
कागदपत्रांच्या नावाखाली महिला कामगारांवर दडपण आणले गेले. एवढेच नाही, तर कामगारांना मिळणाऱ्या किमान वेतन कायद्यालादेखील हरताळ फासण्यात आला. त्यांना मिळणारा महागाई भत्ता आणि इतर भत्ते हे फॉर्ममधील रकाने रिकामे ठेवण्यात आले. ही सर्व प्रक्रिया नियमानुसार होत आहे, की नाही हे पाहण्याची जबाबदारी अधिष्ठाता डॉ. मोरे यांची होती. मात्र, कामगारांचे शोषण करून केवळ कंपनीला फायदा पोचविण्यासाठी त्यांनी सर्व नियम धाब्यावर बसवून याला अधिकृत मंजुरी दिली. डॉ. मोरे यांनी या भ्रष्टाचाराला अधिकृत पाठबळ दिल्याचा आरोप देशमुख यांनी केला.
चारशे कामगार असताना केवळ ३२७ कामगारांना सामावण्यासाठीची नवी निविदा काढण्यात आली. त्यातही नव्या कामगारांचा भरणा केला जात आहे. ही सरळ सरळ कायद्याची पायमल्ली असून कामगारांना योग्य न्याय न मिळाल्यास यापुढे जन विकास सेना कायदा हातात घेऊन आंदोलन करेल, असा इशारा यावेळी देशमुख यांनी दिला.