चंद्रपूर - बुट्टीबोरी येथे वाघांच्या अवयवाची तस्करी करताना चंद्रपूर जिल्ह्यातील काही आरोपींना अटक करण्यात आली होती. या प्रकरणात गोंडपीपरी तालुक्यातील काही आरोपी सामील होते. ज्यांनी वाघाची शिकार केली होती. आता याच प्रकरणाच्या तपासात पोंभूर्णा तालुक्यातील भटारी येथे तीन आरोपींना वनविभागाच्या पथकाने अटक केली आहे. या कारवाईत त्यांच्याकडून वाघांचे अवयव जप्त करण्यात आले आहेत. त्यामुळे जिल्ह्यात वाघांची शिकार आणि त्यांच्या अवयवाची तस्करी करणारे आंतरराष्ट्रीय रॅकेट सक्रिय असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या तपासात आणखी काही शिकारीच्या घटना समोर येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
भटाळी गाठून दोन आरोपींना ताब्यात घेतले
चंद्रपूर जिल्ह्यात वाघांची मोठी संख्या आहे. जितके वाघ ताडोबा व्याघ्रप्रकल्पाच्या परिसरात आहेत. तेवढेच, वाघ हे आजूबाजूच्या परिसरात आहेत. त्यामुळे जिल्ह्यात मानव-वन्यजीव संघर्ष शिगेला पोचला आहे. अशावेळी वाघांना ठार करण्याचेही प्रकार यापूर्वी उघडकीस आले आहेत. मात्र, अशा घटनांमधून नियोजित पध्दतीने वाघांचे अवयव आणि इतर प्राण्यांच्या अवयवाची तस्करी करणारे रॅकेट सक्रिय असल्याचे समोर आले नव्हते. (30 ऑगस्ट)ला नागपूर जिल्ह्यातील बुटीबोरी येथे वाघाच्या अवयवांची तस्करी केली जात असल्याची माहिती स्थानिक वनविभागाला मिळाली. त्यानुसार सापळा रचण्यात आला. यात गोंडपीपरी तालुक्यातील पाचगाव येथील महादेव टेकाम आणि गोकुळदास पवार या दोघांना अटक करण्यात आली होती. त्यांच्याकडून वाघासोबत अन्य वन्यजीवांचे अवयव जप्त करण्यात आले होते. त्यांची कसून चौकशी केल्यानंतर त्यांनी पाचगाव येथील अन्य आरोपींची नावे सांगितली होती. त्यानुसार बुट्टीबोरी आणि चंद्रपूर वनविभागाच्या संयुक्त पथकाने कारवाई करीत पाचगाव येथील रामचंद्र आलाम आणि विजय आलाम यांना अटक केली. साधारण दोन ते अडीच वर्षांपूर्वी मौजा पाचगाव ते परसोडी जंगलाच्या परिसरात ही शिकार करण्यात आली. याच प्रकरणाच्या तपासात या पथकाने (9 सप्टेंबर)ला पोंभूर्णा तालुक्यातील भटारी येथे योगेश तोडासे नामक आरोपीला अटक केली.
भटाळी गाठून दोन आरोपींना ताब्यात घेतले
ताब्यातील आरोपीची कसून चौकशी केली असता, वाघाची शिकार व सहकारी आरोपी यांची त्याने माहिती दिली. माहितीच्या आधारे बुटीबोरी वनविभागाने पोंभूर्णा वनपरिक्षेत्र अधिकारी आम्रपाली खोब्रागडे, बल्लारशहा फिरते पथक वनपरिक्षेत्र अधिकारी फनिंद्र गादेवार, राजुरा फिरते पथक अधिकारी वनकर व कर्मचारी यांनी (१० सप्टेंबर)ला भटाळी गाठून दोन आरोपींना ताब्यात घेतले. त्यांची चौकशी केली असता त्यांच्याकडून १० वाघ नखं, मिशीचे ६ केस, दातं, व हाडं जप्त करण्यात आले.
एका प्रकरणाची दुसऱ्या प्रकरणाशी जुळत जाणारी तारे ही बाब धक्कादायक
जानेवारी महिन्यात या वाघाची करंट लावून शिकार करण्यात आली होती. ही तारही जप्त करण्यात आली. वाघाचे अवयव नखं, दात, मिशा काढून त्या आपसात वाटून घेण्यात आल्या होत्या. त्यानंतर वाघाच्या देहाला जाळून टाकण्यात आले. अशी धक्कादायक कबुली आरोपींनी दिली आहे. एका प्रकरणाची दुसऱ्या प्रकरणाशी जुळत जाणारी तारे ही बाब धक्कादायक आहे. बुट्टीबोरी येथे मध्यस्थीच्या माध्यमातून चंद्रपूर जिल्ह्यातील शिकार केलेल्या वन्यजीवांची अवयवे ही आंतरराष्ट्रीय पातळीवर जात होती. त्यासाठी एक मोठे रॅकेट सक्रिय असल्याचे तपासात समोर येत आहे. याचा सखोल तपास केला, तर ह्या रॅकेटचा पर्दाफाश होऊ शकतो. मात्र, वाघांसाठी सुरक्षित समजल्या जाणाऱ्या चंद्रपूर जिल्ह्यात हे रॅकेट सक्रिय असल्याची ही बाब धक्कादायक आहे.
आता वाघांच्या तस्करीचे सिंदेवाही कनेक्शन
सदर प्रकरणाची चौकशी वनविभागाने सुरू केली आहे. यातून अनेक प्रकार उघडकीस येणार असून, वाघाच्या अवयवांची तस्करी करणारे मोठे रॅकेट जाळ्यात सापडणार असल्याची माहिती आहे. भटाळीच्या वाघाच्या शिकार प्रकरणाचे कनेक्शन सिंदेवाहीकडे वळले असून, वनविभागाची एक टिम चौकशी करण्यासाठी सिंदेवाहीला रवाना झाली आहे. यामध्ये कोणती माहिती समोर येईल, याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे.