चंद्रपूर जिल्हा क्रीडा संकुलातील क्रीडांगणाचे काम तब्बल तीन वर्षानंतर अखेर पूर्ण झाले आहे. त्यामुळे या मैदानी परिसरात पोलीस, आणि सैन्यात भरतीची तयारी करणारे विद्यार्थी तसेच सराव करणाऱ्या खेळाडूंच्या आशा पल्लवीत झाल्या होत्या. मात्र प्रशासकीय हलगर्जीपणा आणि राजकीय पेचामुळे या क्रीडांगणाचे लोकार्पण रखडले आहे. चंद्रपूर जिल्ह्याला सुधीर मुनगंटीवारांच्या Guardian Minister Sudhir Mungantiwar वनमंत्री मिळाले. मात्र त्यांची नियुक्ती अद्याप चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून झालेले नाही. जोवर पालकमंत्री नियुक्त होत नाही, त्यापूर्वी याचे लोकार्पण होणे अवघड आहे. त्यामुळे या क्रीडांगणात सराव करण्यासाठी त्यांना आणखी प्रतीक्षा करावी लागणार आहे. यामुळे त्यांचा हिरमोड झाला आहे.
चंद्रपूर येथील जिल्हा क्रीडा संकुलात क्रीडा विषयक विविध सुविधा तयार करण्याच्या कामाला 2019 मध्ये मंजुरी मिळाली. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून नाशिक येथील पीएच इन्फ्रा या कंपनीला हे काम देण्यात आले. यातून 400 मीटरची आधुनिक सिन्थेटिक धावपट्टी, एक फुटबॉल मैदान तसेच खेळाडूंसाठी शौचालय आणि स्नानगृहे बांधण्याचे काम दिले होते. 13 कोटींच्या निधीतून होणारे हे काम दहा महिन्यांत पूर्ण होणार होते. तत्कालीन पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या कार्यकाळात याला सुरुवात झाली. मात्र, यानंतर राज्यात सत्तापालट झाला. राज्यात महाविकास आघाडी सरकार Maha Vikas Aghadi Govt आले. यानंतर हे काम रखडले. त्यानंतर मार्च महिन्यात कोरोनाची लाट आली आणि हे काम पूर्णतः बारगळले. यानंतर संथगतीने हे काम सुरू होते. तब्बल तीन वर्षांनंतर हे काम पूर्ण झाले. सार्वजनिक बांधकाम विभागाने एक महिन्याआधीच काम पूर्ण झाले असून ते जिल्हा क्रीडा संकुलाकाकडे हस्तांतरित करण्याचे पत्र जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश पुंड यांच्या विभागाला पाठवले होते. मात्र तब्बल एक महिना पुंड यांच्या कार्यालयाकडून याला कुठलाही प्रतिसाद मिळाला नाही.
जोखीम घेऊन खुल्या रस्त्यावर धावतात मुलं मागील तीन वर्षांपासून जिल्हा क्रीडा संकुलाचे मैदान आणि धावपट्टी कामाच्या नावाने बंद आहे. आणि जिल्ह्याच्या ठिकाणी दुसरे मोठे मैदान नसल्याने आणि तिथे सराव करण्याची परवानगी मिळत नसल्याने या मुलांना जीव मुठीत घेऊन रस्त्यावर धावावे लागत आहे. सैन्य आणि पोलीस भरतीसाठी प्रयत्न करणारे अनेक मुलं सकाळी सायंकाळी रहदारीच्या रस्त्यावर धावताना दिसतील. यात अपघात होण्याची मोठी जोखीम असते. त्यामुळे पाय आणि गुडघ्यावर गंभीर दुखापत होते. ही स्थिती म्हणजे शासन आणि प्रशासनाचे अपयश आहे.
ईटीव्ही भारतच्या संपर्काने जागृत झाली यंत्रणा या कामाची वस्तुस्थिती आणि अद्याप सर्वसामान्यांसाठी खुले करण्यास कुठल्या अडचणी येत आहे. हे जाणून घेण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता कुंभे यांना संपर्क केला असता, त्यांनी काम पूर्ण झाले असून हस्तांतरण प्रक्रियेसाठी एक महिन्यांपूर्वी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाला दिले असल्याचे सांगितले. यानंतर यंत्रणेची लगबग सुरू झाली. दुसऱ्या दिवशी त्वरित क्रीडा अधिकारी कार्यालयाकडून कामाची पाहणी करून त्यात दुरुस्ती करून देण्याच्या सूचना करण्यात आली आहे. कंत्राटदाराला तिथे पाठविण्यात आले आणि डागडुजीचे काम सुरू केले आहे.
मुले पहिल्यांदाचा धावपट्टीवर धावले धावपट्टी आणि इतर ठिकाणी काम सुरू केले असल्याने तात्पुरत्या स्वरूपात खेळाडु आणि पोलीस, सैन्यदलाच्या परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थी पहिल्यांदाच या धावपट्टीवर धावले. मात्र काम संपल्यानंतर पुन्हा हे क्रीडांगण सामान्यांसाठी बंद करण्यात येणार आहे.
सरावासाठी विद्यार्थ्यांना मैदान नाही जिल्हा क्रीडा संकुल हे जिल्ह्यातील मुख्य मैदान आहे. त्यामुळे स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे, विशेषत सैन्य आणि पोलीस भरतीसाठी येतात. त्यामुळे या आधुनिक मैदानावर सराव करण्याची मागणी येथे येणाऱ्या विद्यार्थ्यांनी केली होती. याबाबत जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश पुंड यांनी या मुलांना पोलीस भरती साठीच्या मुलांच्या सरावासाठी मैदान देण्यास नकार दिल्याने येथे येणाऱ्या विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे या विद्यार्थ्यांनी जायचे कुठे हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.
पालकमंत्री पदाच्या घोषणेसाठी क्रीडा संकुल अधांतरी जिल्ह्याचे पालकमंत्री हे क्रीडा संकुल समितीचे अध्यक्ष असतात, तर जिल्हाधिकारी हे कार्याध्यक्ष. मात्र पालकमंत्री पदाची घोषणा न झाल्याने हे पद अजून रिक्त आहे. त्यामुळे क्रीडा संकुलाचे काम पूर्ण होऊनही त्याचे लोकार्पण करण्याची जोखीम प्रशासन घेऊ शकेल का ? हा खरा प्रश्न आहे. याबाबत जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांच्याशी संपर्क केला, असता लवकरात लवकर क्रीडा संकुलाचे लोकार्पण होईल असे म्हटले. मात्र, पालकमंत्री जाहीर होण्याची प्रलंबित प्रक्रियेपूर्वी त्याचे लोकार्पण होईल काय याबाबत त्यांनी स्पष्ट बोलणे टाळले.