चंद्रपूर - चिमूर तालुक्यात सोनेगाव येथे आठ लाख 72 हजार 400 रुपयांचा अवैध दारूसाठा जप्त करण्यात आला आहे. मात्र, आरोपी फरार झाले असून तस्करीसाठी वापरण्यात आलेली चारचाकी जप्त करण्यात आली आहे.
मंगळवारी (17मार्च) गस्तीवर असताना चिमूर पोलिसांना अवैधपणे दारूची तस्करी होत असल्याची माहिती मिळाली. यानुसार त्यांनी सापळा रचला. पहाटे चारच्या दरम्यान तस्करी करणारी स्कॉर्पियोचा पाठलाग केला. यानंतर संबंधित चारचाकी सोनेगाव सिरास येथे ताब्यात घेण्यात आली. यामध्ये देशी दारूच्या 18 पेट्या व चारचाकी असा एकूण आठ लाख 72 हजार चारशे रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला आहे. मात्र, अंधाराचा फायदा घेत आरोपी जवळच्या शिवारातून पळून जाण्यात यशस्वी झाले.
वरोऱ्याचे उप विभागीय पोलीस अधिकारी निलेश पांडे विभागाअंतर्गत संबंधित कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये स्वप्नील धुळे, विलास निमगडे, किशोर बोढे यांच्यासह अन्य पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश होता.