चंद्रपूर - नवविवाहित पत्नीच्या अचानक जाण्याचे पती दुःख सहन करू शकला नाही. त्यामुळे त्याने पत्नीच्या चितेला अग्नी देताना स्वतःही चितेच उडी घेतली. यात तो गंभीररित्या भाजला, गावकऱ्यांनी त्याला बाहेर काढले. मात्र, त्याला दुःखावेग अनावर झाल्याने, तेथून गेल्यावर त्याने विहिरीत जाऊन उडी घेत आपले जीवन संपवले. ही हृदयद्रावक आणि थरारपूर्ण घटना चंद्रपूर जिल्ह्यातील भंगाराम तळोधी या गावात घडली आहे. किशोर खाटीक असे आत्महत्या केलेल्या या पतीचे नाव आहे.
चंद्रपूर जिल्ह्याच्या गोंडपिंपरी तालुक्यातील भंगाराम तळोधी येथील गावालगत असलेल्या विहिरीत काल (रविवार) एका 19 वर्षीय नवविवाहितेचा मृतदेह आढळून आला. रुचिता चित्तावार हीचा विवाह किशोर खाटीक याच्याशी 19 मार्च रोजी झाला होता. ती आपल्या पतीसह चंद्रपूरला वास्तव्यास होती. मात्र, चार दिवसांपूर्वी रुचिता भंगाराम तळोधी येथे आली होती. ती तीन महिन्यांची गर्भवती होती. काल सायंकाळच्या सुमारास शौचास बाहेर पडली. परंतु, बराच वेळपर्यंत घरी परतली नाही. त्यामुळे नातेवाईकांनी शोधाशोध सूरू केली. दरम्यान गावालगत असलेल्या विहीरीजवळ लोटा आणि चप्पल आढळून आले. गोंडपिपरी पोलीसांना या घटनेची माहिती देण्यात आली. यानंतर शोधाशोध केली असता विहिरीमध्ये रुचिताचा मृतदेह आढळून आला.
हेही वाचा... आदिवासी विकास महामंडळाचा बेजबाबदारपणा.. गोदामांअभावी शेकडो क्विंटल धान्य पावसाने सडले
रुचिताच्या मृत्यूचे कारण स्पष्ट होऊ शकले नाही. मात्र, याचा मोठा आघात पती किशोर खाटीक यांच्यावर झाला. आज (सोमवार) दुपारी रुचितावर अंत्यसंस्कार होत होते. पती किशोर ह्याने तिला चिताग्नी दिली. मात्र, त्याच्या मनात दुसरेच काही सुरू होते. दरम्यान, पत्नीचे पार्थिव पेट घेतल्यानंतर त्याने थेट चितेतच उडी घेतली. यात मोठया प्रमाणात किशोर जळाला. गावातील नागरिकांनी त्याला बाहेर काढले. परंतु, पत्नीच्या विरहात बहुदा त्याला एक क्षणही राहायचे नव्हते. अखेर त्याने धाव घेत थेट विहिरीत उडी घेऊन आपली जीवनयात्रा संपवली.