चंद्रपूर - जिल्ह्यात थंडीचा जोर वाढला असतानाच अचानक पावसाने जोर धरला आहे. गुरुवारी झालेल्या पावसाने गोंडपिपरी तालुक्याला चांगलेच झोडपून काढले. नाल्याला पूर आला तर हरबरा, गहू, मूग पिकात पाणी साचले. वादळी पावसाने कापूस गळला असून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. तर, पोंभुर्णा तालुक्यातील चिंतलधाबा येथे वीज कोसळल्याने एक शेतकरी ठार झाल्याची घटना घडली आहे.
जिल्ह्यात मध्यरात्रीपासून अवकाळी पावसाने हजेरी लावली. त्यामुळे रब्बी पिकांचे नुकसान होण्याची मोठी शक्यता निर्माण झाली आहे. गेल्या २ दिवसांपासून जिल्ह्यात ढगाळी वातावरण, आणि गारवाही होता. यातच गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास जोरदार पाऊस कोसळला. ऐन थंडीच्या दिवसात जिल्ह्यातील काही भागात मुसळधार पाऊस बरसल्याने कोरडे नाले वाहू लागल्याचे चित्र बघायला मिळत आहे.
पोंभुर्णा तालुक्यातील चिंतलधाबा गावात सकाळी वीज पडून एकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. राम्मन्नी देवलोहट (वय ५५) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. शेतातून परत येत असताना अंगावर वीज पडून त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे.
हेही वाचा - अहिरांच्या 'खदखदी'तून मुनगंटीवारांवर कटाक्ष; आत्मचिंतन करण्याचे केले आवाहन
पावसामुळे जिल्ह्यात रब्बी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची माहिती समोर येत आहे. हरभरा, गहू, मूग, तूर, लाखेच्या शेतात पावसाचे पाणी साचले असून शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. अजूनही पावसाची रिपरिप सुरूच असून आज दुपारपर्यंत वातावरण असेच राहण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
हेही वाचा - ऐन थंडीत पाऊस, रेनकोट घालावा की स्वेटर? चंद्रपूरकरांना प्रश्न