चंद्रपूर - तेलंगणा राज्यातून 21 जुलैला एक महिला चंद्रपूर येथील एका खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल झाली होती. कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने महिलेवर रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र, वैद्यकीय उपचारानंतरही 24 जुलैच्या पहाटे 2.30 वाजता महिलेचा मृत्यू झाला आहे. अंत्यसंस्कारासाठी नातेवाईक अनुपस्थित असल्याने महिलेच्या मृतदेहावर महानगरपालिका कर्मचाऱ्यांकडून अंत्यसंस्कार करण्यात आला.
महानगरपालिका आयुक्त राजेश मोहिते यांनी अंत्यसंस्काराची तयारी मनपाला करावी लागणार, याची पूर्वकल्पना कर्मचाऱ्यांना सकाळीच दिली होती. अंत्यसंस्काराची रंगीत तालीम यापूर्वी मनपाद्वारे करण्यात आली होती, त्यानुसार तयारी सुरु करण्यात आली. अंत्यसंस्कारासाठी कुणीही नातेवाईक समोर न आल्याने शेवटी महानगरपालिकेने पुढाकार घेऊन अंत्यसंस्कार विधी पार पाडला.
श्वसनासंदर्भातील समस्या होत असल्याने सदर महिला 21 जुलैला चंद्रपूर येथील एका खासगी रुग्णालयामध्ये दाखल झाली होती. तसेच महिलेला उच्चरक्तदाबाची त्रास होता. कोरोनाची लक्षणे दिसत असल्याने महिलेची 22 जुलैला कोरोना चाचणी घेण्यात आल्यानंतर 23 जुलैला रात्री 9:30 वाजता अहवाल पॉझिटिव्ह आला.
23 जुलैच्या रात्री 12.59 च्या सुमारास या महिलेला वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात अतिशय गंभीर अवस्थेत हलवण्यात आले. या ठिकाणी त्यांच्यावर शर्थीचे वैद्यकीय उपचार करण्यात आले. मात्र, 24 जुलैच्या पहाटे 2.30 वाजता महिलेचा मृत्यू झाला. सदर महिला तेलंगणा राज्यातील अदिलाबाद जिल्ह्यातील जैनढ या गावातील रहिवासी आहे. त्यामुळे त्यांच्या मृत्यूची नोंद आदिलाबाद तेलंगणा येथे होणार असल्याचे शिळा प्रशासनाद्वारे स्पष्ट करण्यात आले आहे.
दरम्यान,मार्चच्या पहिल्या आठवड्यात कोरोनाचा राज्यात शिरकाव झाल्यापासून जिल्ह्यात प्रतिबंधात्मक उपाय म्हणून लॉकडाऊन करण्यात आले होते. यानंतर महानगरपालिका प्रशासनाने कोरोनाचा प्रतिबंध करण्यास कसोशीने प्रयत्न सुरु केले. रुग्ण तात्काळ सापडावे, यासाठी चाचण्यांची संख्या वाढविण्यात आली. रुग्णांना तातडीने वैद्यकीय उपचार मिळेल याचे नियोजन करण्यात आले.