चंद्रपूर - शहरातील एकाच कुटुंबातील तिघांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. याशिवाय अन्य एका ३१ वर्षीय नागरिकाचा अहवालही पॉझिटीव्ह आला आहे. जिल्हा आरोग्य यंत्रणेने दिलेल्या माहितीनुसार चंद्रपूर जिल्ह्यातील आतापर्यंत बाधितांची संख्या ६१ झाली आहे. जिल्ह्यामध्ये सध्या १८ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तर, आतापर्यंत ४३ नागरिक कोरोनामुक्त झाले आहेत.
१६ जुनला हैदराबाद शहरातून लुंबीनीनगर भागात आलेल्या कुटुंबाला होम क्वारंटाईन करण्यात आले होते. या तिघांचेही स्वॅब २२ जून रोजी घेण्यात आले होते. २३ जुनला हे सर्व पॉझिटिव्ह असल्याचे स्पष्ट झाले आहे. तर, बिनबा वार्ड परिसरातील अन्य ३१ वर्षीय बाधीत व्यक्ती सिकंदराबाद येथून १९ जून रोजी परत आला होता. यानंतर तो होम क्वारंटाईन होता. २२ जून रोजी त्याचा स्वॅब घेण्यात आला. २३ रोजी अहवाल पॉझिटिव्ह असल्याचे समोर आले.