चंद्रपूर - समाजसेवेला माध्यम बनवत राजकारणात सक्रिय होणे काही नवीन नाही. मात्र, आपल्या हातून गोरगरीब, वंचित समाजाची सेवा व्हावी यासाठी राजकारणाचा त्याग करणारे उदाहरण वेगळेच म्हणावे लागेल. अरविंद रेवतकर हे असेच एक अपवादात्मक व्यक्तिमत्त्व आहे. कोरोनाच्या काळात त्यांनी केलेले समाजकार्य हे उल्लेखनीय आहे. आज राजकारणाला रामराम ठोकून त्यांना तीन वर्षे झाली. मात्र, समाजसेवेचे कार्य अविरत सुरू आहे. विशेष करून कोरोनाच्या काळात त्यांनी केलेल्या कार्यामुळे चिमुर तालुक्यातील २९ गावे कोरोनामुक्त आहेत, हे उल्लेखनीय आणि दखलपात्र असे आहे.
कोरोनाचा विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून संपुर्ण गावाला फवारणी मारून निर्जंतुक करणे, मास्क वाटप करणे आणि गरीबांना मोफत गरजू वस्तूंची किट वितरित करणे असे रेवतकर यांच्या कार्याचे स्वरूप आहे. त्यांचे हे कार्य केवळ एक किंवा दोन गावांपुरते नाही, तर चिमुर तालुक्यातील 29 गावांमध्ये रेवतकरांच्या मार्गदर्शनाखाली या प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविल्या जात आहेत. याचाच परिणाम म्हणून आज चिमूर तालुक्यातील या 29 गावांत एकही कोरोनाचा रुग्ण आढळला नाही हे विशेष. कोरोनाच्या कठीण काळात अरविंद रेवतकर यांचे कार्य हे समाजासाठी एक आदर्श कार्य असेच आहे.
संपूर्ण देशात जेव्हा संचारबंदी लावण्यात आली तेव्हा अनेकांनी गरिबांना धान्याची किट देणे, मास्क वाटप करण्याची मोहीम राबविली. मात्र, ही चमकोगिरी केवळ फोटोसेशन करून सोशल मीडियावर टाकून स्वतःचे कौतुक करून घेणे एवढ्यापुरतीच मर्यादित होती. आता ही समाजसेवा कोणीही करताना दिसत नाही. मात्र, चिमूर तालुक्यातील भिसी येथील अरविंद रेवतकर हे कार्य अजूनही करीत आहेत. ते आणि त्यांचा दोन-अडीचशेचा मित्रपरिवार भिसी-आंबोली जिल्हा परिषद क्षेत्रातील 29 गावांची सेवा करीत आहेत. विशेष म्हणजे कोणाकडून एक छदामही न घेता ही मदत केली जात आहे.
अरविंद रेवतकर हे पूर्वी राजकारणात सक्रिय होते. 2010 ते 15 यादरम्यान ते चिमुर तालुक्यातील भिसी गावचे ग्रामपंचायत सदस्य होते. तर 2015 ते 17 दरम्यान त्यांनी सरपंच म्हणून पद भूषवले. मात्र काही तांत्रीक कारणाने ते सरपंच म्हणून अपात्र झाले. यानंतर त्यांनी थेट राजकारणातुन संन्यास घेत समाजकारणाची कास धरली. कुणाच्याही मदतीला धावून जाणं, कुणाला आर्थिक मदत करणं, सामाजिक कार्यक्रमात सक्रिय सामील होणं या पद्धतीनं त्यांचे कार्य सुरू होते. सामान्य शेतकरी असूनही ते त्यांनी मदतीचे हात कधी आखडले नाहीत. त्यांच्या या कार्याला त्यांच्या पत्नीचीही साथ आहे.
2020 च्या सुरुवातीलाच कोरोनाचे संकट आले आणि 24 मार्चपासून संपूर्ण देशात टाळेबंदी घोषित करण्यात आली. याचा सर्वात मोठा फटका गोरगरिबांना बसला. हातावर आणून पानावर खाणे अशी त्यांची स्थिती होती. टाळेबंदीत अशा लोकांवर उपासमारीचे संकट ओढवले. यावेळी सर्वात आधी धाव घेतली ते रेवतकर यांनी. जिल्हा परिषद क्षेत्रातील अशा लोकांना त्यांनी अन्नधान्य आणि किराणाच्या किट वाटप करणे सुरू केले. ही लोक सुरक्षित राहावं म्हणून नागपूर येथून काही मास्क विशेष बनवून घेतले, त्याचे वितरण केले.
लोकांमध्ये कोरोनाविषयी जागरूकता निर्माण व्हावी यासाठी अनेक ठिकाणी फलक लावले. अरविंद रेवतकर यांचे हे कार्य बघून अनेक तरुण स्वयंस्फूर्तीने त्याच्या कार्यात सहभागी झाले. आज हा परिवार 250 च्या घरात आहे. ग्रामपंचायतिच्या वतीने निर्जंतुकीकारणाच्या नावाने निव्वळ ब्लिचिंग पावडर टाकून फवारणी मारण्यात येत असल्याचे रेवतकर यांच्या निदर्शनास आले. याबाबत रेवतकर यांनी डॉक्टरांचा सल्ला घेतला आणि त्यासाठी सर्व यंत्र, तंत्र आणि औषध इकडून तिकडून मिळविले. यासाठी बरेच परिश्रम घ्यावे लागले. मात्र, ज्याला खरं निर्जंतुकीकरण म्हणता येईल अशी प्रक्रिया त्यांनी शोधून काढली. आणि गावेच्या गावे फवारणी मारून निर्जंतुक केले. आज सहा महिने लोटले तरी अजूनही हे काम अविरतपणे सुरू आहे. विशेष म्हणजे या 29 गावात अजून एकही कोरोनाचा रुग्ण सापडला नाही. त्यामुळे ही चमकोगिरी नसून खरी मानवसेवा आहे.
आज कोरोनाच्या कठीण काळात अरविंद रेवतकर यांचे कार्य हे प्रेरणादायी आणि आदर्श तसेच आहे. या स्थितीचा सामना करायचा असेल तर अशा अनेक अरविंद रेवतकरची समाजाला खऱ्या अर्थाने गरज आहे.