चंद्रपूर - जिल्ह्यात कोरोनामुळे 42 वर्षीय पहिल्या रुग्णाचा मृत्यू झाला आहे. त्याच्यावर चंद्रपूर वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात उपचार सुरू होते. हा रुग्ण ३० जुलैला चंद्रपूर वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात दाखल झाला होता. आज (शनिवार) दुपारी दीडच्या सुमारास या रुग्णाचा मृत्यू झाला. चंद्रपूर शहरातील रहमतनगर येथील रहिवासी असणारा हा रूग्ण ३० जुलैला रात्री अकरा वाजता अमरावती येथून चंद्रपूर शहरात दाखल झाला होता.
तो व्यक्ती अमरावती येथे एक लग्नसमारंभासाठी गेला होता. यापूर्वीपासूनच त्याला श्वास घायला त्रास होत होता. जेव्हा चंद्रपूर येथील रुग्णालयात त्याला दाखल करण्यात आले, तेव्हा त्याची प्रकृती नाजूक होती. श्वास घ्यायला त्याला त्रास होत होता. त्याचे ऑक्सिजनचे प्रमाण देखील खूप कमी झाले होते. त्याला कृत्रिम श्वासोच्छ्वास देण्यात येत होता. छातीचा एक्सरे काढल्यावर त्याला निमोनिया झाल्याचे निदर्शनास आले. त्याचा स्वाब घेतला असता तो कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निदर्शनास आले.
हा व्यक्ती रहमतनगर येथील निवासी होता. तो रुग्णालयात येण्यापूर्वी आपल्या घरी गेला होता का याचा तपास आरोग्य विभाग करीत आहे. असे आढळून आल्यास हा संपूर्ण परिसर प्रतिबंधक क्षेत्र म्हणून घोषित करण्यात येणार आहे. सध्या जिल्ह्यात पाच असे रुग्ण आहेत ज्याची स्थिती थोडी नाजूक आहे. चंद्रपूर जिल्ह्यामध्ये एक ऑगस्टपर्यंत ५३६ कोरोनाबाधित असून, त्यापैकी ३३८ बरे झाले आहेत. तर १९८ जणांवर सध्या उपचार सुरू आहेत.