चंद्रपूर : हल्ल्याबाबत रावत यांनी शंका व्यक्त केली आहे. संतोषसिंग रावत म्हणाले की, आजवर माझे कुणाशीही वैरत्व नाही, त्यामुळे कोणी आपल्यावर हल्ला करण्याचा प्रश्नच येत नाही. मात्र, काँग्रेसचा निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून मी पक्षासाठी दिवसरात्र कार्य करीत आहे. याचेच फळ म्हणून जिल्हा बॅंकेच्या अध्यक्षपदावर पोहचू शकलो, पक्षाने दिलेली जबाबदारी आपण चांगली पार पाडली. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणूकित आपल्या क्षेत्रात कधी नव्हे ती एकहाती सत्ता काबीज केली. मात्र ही राजकिय प्रगती कुणाला आवडली नसेल, आपण मोठे असल्याचे बघून हा भ्याड हल्ला करण्यात आला असावा अशी शंका, संतोषसिंग रावत यांनी व्यक्त केली. त्यांच्या या शंकेने राजकीय चर्चेला उधाण आले आहे.
पाळत ठेऊन केला हल्ला: 11 मे ला संतोषसिंग रावत हे मुल येथील एक बैठक आटोपून दुचाकीने घरी जात असताना, त्यांच्यावर पाळत ठेवणाऱ्या मारुती स्विफ्ट गाडीतून एकाने रावत यांच्यावर गोळीबार केला. त्या दिवशी रावत यांच्या हालचालींवर हे हल्लेखोर पाळत ठेऊन होते. चंद्रपूरपासून त्यांचा पाठलाग सुरू होता. संपूर्णता नियोजित हा हल्ला असल्याचे प्राथमिकदृष्ट्या दिसून येत आहे. वाहनाची नंबर प्लेट देखील बनावट असल्याचे तपासात समोर आले आहे. हा हल्ला झाल्यानंतर या वाहनाचा पाठलाग करण्याचा प्रयत्न करण्यात आला, मात्र हल्लेखोर पसार होण्यात यशस्वी झाले.
हल्ल्याचा केला निषेध: हल्ल्यानंतर मूल येथे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला होता. काँग्रेसच्या नेत्यांनी या भ्याड हल्ल्याचा निषेध करत चौकशीची मागणी केली. रावत हे विजय वडेट्टीवार यांचे खंदे समर्थक असल्याने तीन दिवसांच्या आत आरोपींना पकडा अन्यथा काँग्रेसच्या वतीने संपूर्ण जिल्ह्यात आंदोलन पुकारण्यात येण्याचा इशारा दिला होता.
काय म्हणाले रावत: या हल्ल्याबाबत रावत यांच्याशी संपर्क केला असता, त्यांनी आपली कुणाशीही शत्रूता नसून असा जीवघेणा हल्ला होणे अनपेक्षित आहे. पण आपली राजकीय प्रगती बघून जर कुणाला असूया होत असेल तर, त्यातून कदाचित हा हल्ला होऊ शकतो अशी शंका त्यांनी व्यक्त केली. मात्र यावर फार स्पष्ट भाष्य करण्याचे त्यांनी टाळले.
पोलिसांच्या तपासाबाबत समाधानी: गोळीबार केल्याच्या घटनेला चार दिवस उलटून गेलीत मात्र हल्लेखोर अजून पकडल्या गेले नाही. काँग्रेसने तीन दिवसांचा वेळ दिला होता, याबाबत विचारले असता रावत यांनी पोलीस तपासबाबत समाधान व्यक्त केले आहे. पोलीस विभाग याबाबत कठोर परिश्रम घेत असून, त्यांचा योग्य दिशेने तपास सुरू आहे. राजकीय दबाव तपासात बाधा बनू नये म्हणून पोलिसांना वेळ देणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले.
15 पथकांचा तपास: चंद्रपूर जिल्ह्यात एखाद्या राजकिय व्यक्तीवर चक्क गोळीबार झाल्याची ही पहिलीच घटना आहे. त्यामुळे पोलिसांनी या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन तपास सुरू केला आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक रवींद्र परदेशी यांच्या नेतृत्वाखाली तब्बल 15 विशेष पथके नेमण्यात आली आहे. आज पोलीस अधीक्षक परदेशी हे मूल येथे याच हल्ल्याचा तपास संदर्भात आले होते. पोलीस तपासाबाबत कमालीची गुप्तता पाळण्यात येत आहे.
हेही वाचा -