चंद्रपूर - बाहेरून कणखर दिसणारा बाप हा आतून मात्र, हळवा असतो. आदीवासी गावातील अशाच एका कणखर बापाने गुजरातवरून आलेल्या आपल्या मुलीला गावाच्या सुरक्षेसाठी संस्थात्मक क्वारंटाईन करण्याचा निर्णय घेतला. गावातील शाळेच्या इमारतीमध्ये त्यांना क्वारंटाईन केले. काळजीने चिंताक्रांत झालेला हा बाप त्यांच्या सुरक्षेसाठी शाळेबाहेर रात्र जागून काढत आहे. बापाच्या निर्णयाने दूखावलेली लेक बापाचा हळवेपणा बघून गहिवरली आहे.
सूरेश शंकर पेंदोर असे त्यांचे नाव आहे. गोंडपिपरी तालूक्यातील चिवंडा या आदिवासीबहुल गावात ते वास्तव्यास आहेत. गोंडपिपरी तालूक्यातील चिवंडा हे लहानसे गाव जंगला लगत वसलेले असून गावात आदिवासी बांधवांची संख्या मोठी आहे. सूरेश पेंदोर यांची मुलगी रोषणी ही गुजरात राज्यातील बडोदरा येथील एका कंपनीत कामावर होती. लॉकडाऊनमुळे ती गुजरातमध्ये अडकली होती. मात्र, लॉकडाऊनमध्ये शिथिलता मिळताच तीने गाव गाठायचं ठरवलं.
अडचणींचा सामना करत ती गुजरातवरुन वर्धेला पोहचली. मात्र, वर्धेला पोहचल्यावर तीला संस्थात्मक विलगीकरणात ठेवण्यात आले. तिने वडीलांना याची माहीती दिली. वडील सूरेश शंकर पेंदोर अस्वस्थ झाले. त्यांनी धाबा उप पोलीस स्टेशनचे ठाणेदार सुशील धोकटे यांची भेट घेतली आणि मुलीला स्वगावी आणण्यासाठी मदत करण्याची विनंती केली. ठाणेदारांनी वाहन पुरविले आणि पोडसा गावातील उपसरपंच देविदास सातपुते यांनीही मदतीचा हात पुढे केला.
आई वेणाबाई या वर्धेला गेल्या आणि मुलीला घेऊन परतल्या. रोषणी रेडझोनमधून आल्याने ग्रामपंचायतेने माय-लेकीला गृह विलगीकरण करण्याचे ठरविले. मात्र, गृह विलगीकरणाला वडीलांनी नकार दिला. मुलगी रेडझोन मधून आली आहे. चुकून ती कोरोनाबाधित निघाली तर गावावर संकट ओढावेल. त्यामुळे या दोघींचे संस्थात्मक विलगीकरण करण्याचा निर्णय घेतला.
गावातील जिल्हा परिषद शाळेचा इमारतीत या दोघींना ठेवण्यात आले आहे. वडीलांच्या भुमिकेने माय-लेक नाराज झाल्या होत्या. मात्र, गावाच्या सूरक्षेसाठी कणखर भुमिका घेतलेल्या बापाचा हळवेपणा बघून त्यांना गहिवरून आले. शाळेच्या इमारतीत दोघीच माय-लेक आहेत. त्या घाबरु नये म्हणून, वडील रोज रात्री शाळा परिसरातच झोपतात. माय-लेकीला धीर देतात. बारा दिवसापासून माय-लेकी विलगीकरणात आहेत. दोन दिवसांनी त्या घरी जाणार आहेत. या दरम्यान बापाचा स्वभावातील अनेक कांगोरे मुलीने बघीतले. "बाप हो तो ऐसा " अशा भावना तीने व्यक्त केल्या आहेत.