चंद्रपूर - सासरा आणि मेव्हण्याने मिळून लोखंडी रॉड आणि कुऱ्हाडीने जावयाची हत्या केल्याची घटना भद्रावती तालुक्यातील माजरी परिसरात घडली. रविवारी रात्री दोन्ही आरोपींनी पोलीस ठाण्यात आत्मसमर्पण केले. आठ दिवसांपूर्वी माजरीत अतिक्रमणाच्या जागेसाठी वाद होऊन एका युवकाची धारदार शस्त्राने वार करून हत्या झाली होती. आता पुन्हा या घटनेने माजरीत खळबळ उडाली आहे.
पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार मृत संदीप हरिदास साबळे (वय- 30) याने काही वर्षांपूर्वी अमृतलाल केवट यांच्या मुलीसोबत (ज्योती) प्रेमविवाह केला होता. विवाहानंतर त्यांना एक मुलगा व एक मुलगी झाली होती. एक वर्षापूर्वी त्याच्या मुलगा आणि पत्नी माहेरी असताना मुलाचा नाल्यात बुडून मृत्यू झाला. यानंतर त्यांचे आपसात वाद सुरू झाले. संदीप पत्नीला मारहाण करत असल्याने ज्योती मुलीसह माहेरी राहत होती. संदीप नेहमी मद्यपान करून सासरवाडीत पत्नी व सासऱ्यासोबत भांडण करायचा. एक महिन्यापूर्वी पती-पत्नीत भांडण झाले होते.
रविवारी संदीपची पत्नी रेल्वे कॉलनीत मोलकरणीचे काम करून परत येताना संदीप साबळेने तिचा हात पकडून घरी येण्यासाठी जबरदस्ती केली. यावेळी झटापटीत त्यांच्या मेव्हण्याने (विजय अमरितलाल केवट) मध्यस्थी करून बाहिणीचा हाथ सोडवला. मात्र, संदीपने त्याच्या डोक्यावर काचेची बाटली मारली. यानंतर सासरा अमृतलाल याने लोखंडी रॉड व मेव्हण्याने कुऱ्हाडने संदीप साबळेच्या डोक्यावर वार केले.
दरम्यान एकता नगर रस्त्याच्या गल्लीतून आरडाओरडा ऐकू आल्याने संदीपचे काका मोक्यावर धावून गेले. यावेळी त्यांना संदीप रक्ताच्या थारोळ्यात जमीनीवर पडलेला दिसला. आरोपी सासरा अमृतलाल केवट (४८) व विजय केवट (१९) हे हल्ला करून निघून गेले होते. काका चरण साबळे यांनी जवळच्या लोकांना आवाज देऊन संदीपला वेकोलीच्या रुग्णालयात दाखल केले. त्याची प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी चंद्रपूरला दाखल करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला. मात्र उपचारादरम्यान संदीप साबळे याचा मृत्यू झाला. माजरी पोलिसांनी आरोपी अमृतलाल केवट आणि विजय केवट यांच्या विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. त्यांना न्यायालयाने पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.