चंद्रपूर - 'एचटीबीटी' या कापसाच्या बियाण्यावर केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने बंदी आणली आहे. याविरोधात १२ जूनला शेतकरी संघटना आंदोलन करणार आहे. यावेळी १७ जिल्ह्यातील कापूस उत्पादक शेतकरी बंदी असलेल्या बियाणांची लागवड करणार आहेत. गुन्हे दाखल झाले, तरी हे आंदोलन होणार असल्याची माहिती शेतकरी संघटनेचे ज्येष्ठ नेते अॅड. वामनराव चटप यांनी दिली आहे.
जनुकीय तंत्रावर विकसित बियाण्यांवर जगात मोठा शोध झालेला आहे. सध्या या तंत्रज्ञानाचा वापर चौथ्या टप्प्यात आहे. मात्र, देशात या वाणाच्या बियाण्यांना मान्यताच देण्यात आलेली नाही. याच्या वापराने उत्पादनात वाढ होते. तसेच याचा पर्यावरणावर कुठलाही विपरीत परिणाम होत नाही, असा वापरकर्त्यांचा दावा आहे. शेतकऱ्याला आधुनिक तंत्रज्ञान वापरण्याचा हक्क आहे. मात्र, केंद्रीय पर्यावरण खात्याच्या बंदीमुळे शेतकरी अडचणीत आला आहे. याविरोधात शेतकरी संघटना मोठे आंदोलन करणार आहे. येत्या १२ जूनला शेतकरी बंदी असलेल्या चोरबीटी या कापसाच्या बियाण्यांची लागवड आपल्या शेतात करणार आहेत. यावर प्रशासनाने गुन्हे दाखल करावे, असा इशाराही यावेळी देण्यात आला आहे.
काय आहे चोरबीटी -
जनुकीय तंत्रावर विकसित बियाणे तयार करण्याला बीटी म्हणतात. या बियाणांवर बंदी असूनही शेतकरी याचा मोठ्या प्रमाणात वापर करीत असतात. खर्च कमी आणि उत्पादन अधिक यासाठी हे वाण ओळखले जाते. बंदी असल्याने ते चोरीनेच वापरले जाते. त्यामुळे या बियाणाला आता चोरबीटी म्हटले जाते.
या बियाणांवर बंदी का आहे -
या बियाणांवर बंदी येण्यासाठी मोठे दबावतंत्र कार्यरत आहे, असे अॅड. वामनराव चटप यांनी सांगितले. स्वदेशी जागरण मंच तसेच काही पर्यावरण संघटना आणि कीटकनाशक कंपन्यांच्या दबावतंत्रामुळे अजूनही या बियाणांवर बंदी कायम आहे, असेदेखील चटप म्हणाले.
कुठे होते उत्पादन -
चोरबीटी बियाणांचे उत्पादन गुजरात आणि तेलंगाणा राज्यात होते. या राज्यातून चोर मार्गाने या बियाणांची तस्करी अन्य राज्यांमध्ये केली जाते. यासाठी एक मोठे रॅकेट सक्रीय आहे. त्यामुळे या कारखान्यांवर कुठलीही कारवाई होत नाही, असा आरोप चटप यांनी केला.