गोंडपिपरी (चंद्रपूर) - शेतात पाण्यासह इतर सुविधेसाठी शेतकऱ्यांनी वीज वितरण कंपनीच्या माध्यमातून सिआरआय कंपनीचे सोलारपंप घेतले होते. पण, काही दिवसांतच ते बिघडले. गॅरन्टी असूनही कंपनी दुरुस्त करुन देण्यास तयार नव्हती. वर्ष होऊनही दुरुस्ती होत नसल्याने शेतकऱ्यांनी मनिष वासमवार यांची भेट घेत वीज वितरण कंपनीच्या कार्यालयावर धडक दिली. दहा दिवसांत सोलार दुरुस्त करुन न दिल्यास आंदोलन करण्याचा इशारा शेतकऱ्यांनी यावेळी निवेदनाद्वारे दिला आहे.
गोंडपिपरी तालुक्यात मुख्यमंत्री सोलर कृषी पंप योजनेतून मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांनी सोलारपंप खरेदी केली. वीज वितरण कंपनीच्या माध्यमातून सिआरआय या कंपनीचे हे सोलार होते. सोलर घेतावेळी कंपनीने गॅरन्टी दिली होती. बिघाड झाल्यास तत्काळ दुरुस्ती करुन देण्यात येईल, असे सांगण्यात आले होते. सोलारपंप घेतल्यानंतर अगदी काही काळात सोलारमध्ये बिघाड झाला. दुरुस्ती करुन द्यावी, यासाठी शेतकऱ्यांनी अनेकवेळा वीज वितरण कंपनीच्या कार्यालयाकडे हेलपाटे मारले. मात्र, आठ महिन्यांपासून यावर कोणताच उपाय काढण्यात आला नाही. पेरणीचा काळ संपला असून आता पिकांना पाणी देण्याची वेळ आहे. मात्र, सोलारपंप नादुरुस्त असल्याने पाणी देता येत नाही. यामुळे शेतकरी संतापले आहे.
तोहोगाव येथील बाबुराव बोंडे, संतोष अलगमकार, नामदेव चौधरी, शिबु चौधरी, शंकर येलमुले, गुणवंत बोबडे या शेतकऱ्यांनी मनीष वासमवार यांची भेट घेतली. त्यांना प्रकरणाची माहिती दिल्यांनतर वासमवार यांनी शेतकऱ्यांना सोबत घेत वीज वितरण कार्यालयावर धडक दिली.आठ महिन्यापासून हा प्रकार सुरू असताना विभाग काय करतोय असा जाब त्यांनी विचारत येत्या दहा दिवसात याप्रकरणी तोडगा न निघाल्यास तीव्र आंदोलनाचा, इशारा त्यांनी दिला.