चंद्रपूर - जिवती तालुक्यातील शेनगाव येथील दादाराव सानप या शेतकऱ्याने तहसीलदारांच्या कार्यालयातच विषप्राशन केले होते. त्यांच्या नातेवाइकांनी या घटनेबाबत गंभीर आरोप केले आहेत. जिवती तालुक्याचे तहसीलदार प्रशांत बेडसे हे आपली जमीन हडप करणाऱ्यांची साथ देऊन आपल्याला नाहक त्रास देत होते. ते दादाराव यांना तासंतास कार्यालयात उभे ठेवत होते. या जाचाला कंटाळूनच दादाराव यांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला असा गंभीर आरोप नातेवाईकांनी केला आहे.
हेही वाचा - टेम्पोत कोंबून बसवले ४६ विद्यार्थी; पर्यायी वाहन नसल्याने व्यवस्था केल्याचे मुख्याध्यापकाचे स्पष्टीकरण
दादाराव सानप यांची वडिलोपार्जित जमीन जिवती-गडचांदूर मार्गावर आहे. या जमिनीचा सातबारा त्यांच्या नावावर आहे. मात्र, या जागेवर राजू मलया गोप या सावकाराने ही जमीन माझीच असल्याचा तगादा सुरू केला. यासाठी गोप याने काही लोकांना आपल्या बाजूने साक्ष देण्यासाठी तयार केले. त्यांना या जमिनीतील काही जागा देण्याचे आमिष दाखवले. या जागेचा कुठलाही पुरावा नसताना सावकार गोप याने जमीन हडपण्यासाठी बळजबरी करणे सुरू केले. याविरोधात शेतकरी सानप यांनी भूमि अभिलेखा कार्यालयात चकरा मारल्या, तहसीलदार प्रशांत बेडसे यांच्याकडे दाद मागितली. मात्र, त्यांना न्याय देण्याऐवजी त्यांनी सावकाराची साथ दिली. तक्रारीचा निपटारा करताना सावकाराला बसण्यासाठी खुर्ची तर शेतकरी सानप यांना उभे ठेवले जात होते. 13 सप्टेंबरला जमीन मोजण्याचे ठरले होते. मात्र, सावकाराने ही मोजणी होऊच दिली नाही. 7 नोव्हेंबरला मोजणी ठरली असता तहसीलदार यांनी नोटीस देऊन तहसील कार्यालयातच उभे ठेवले. 4 डिसेंबरला तोडफोड केल्याचा आरोप करत सानप कुटुंबीयांवर कारवाई करण्यात आली. या संपूर्ण प्रकरणामुळे हतबल होऊन सानप यांनी तहसील कार्यालयात जाऊन विषप्राशन केले. याला संपूर्णत तहसीलदार जबाबदार असून त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी सानप कुटुंबीयांनी केली आहे.
हेही वाचा - राजुऱ्यातील बेपत्ता व्यक्तीचा वर्धा नदी पात्रात आढळला मृतदेह