चंद्रपूर - परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले आहे. अतिवृष्टीचा फटका सोयाबीन, कापूस अशा सर्वच पिकांना बसला आहे. जिल्ह्यातल्या राजूरा, विरूर क्षेत्रात अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका बसला आहे. हाता-तोडांशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनाच्या मदतीची अपेक्षा आहे. मात्र असे असताना जिल्ह्यात अद्यापही नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे झाले नसल्याचे चित्र आहे.
राजूरा, विरूर परिसरात गेल्या आठवड्यात परतीच्या पावसाने झोडपून काढले आहे. वादळी पावसाने शेतपिके उद्ध्वस्त झाली. या भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर कापूस, सोयाबीन, धान पिकांची लागवड होते. दिवाळीपूर्वी सोयाबीन व धान पीक शेतकऱ्यांच्या हातात येत असते. सणासुदीच्या दिवसात एक मोठा आधार शेतकऱ्यांना असतो. मात्र ही पिके हातची गेल्याने आता वर्षभराचा खर्च कसा भागवायचा आणि जगायचे कसे, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. आर्थिक मदत मिळावी यासाठी शासनाकडे निवेदने देण्यात आली आहेत. मात्र अद्यापही नुकसानग्रस्त शेतीचे पंचनामे झालेले नाहीत. पंचनामे करण्याचे आदेश आम्हाला मिळाले नसल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे.