चंद्रपूर - कर्जदार कुटुंबाला पेट्रोल टाकून जीवंत जाळण्याचा धक्कादायक प्रकार शास्त्रीनगर येथे घडला. यात कर्जदार व त्याचा मुलगा जखमी झाला असून कर्जदाराच्या पत्नीची प्रकृती गंभीर आहे. या थरारक घटनेमुळे सर्वत्र खळबळ माजली आहे. सोनू सरदार असे अवैध सावकारी करणाऱ्याचे नाव आहे.
शास्त्रीनगर येथे राहणारे हरिश्चंद्र हरिणखेडे हे शिक्षक आहेत. त्यांनी जसबीर भाटीया उर्फ सोनू सरदार यांच्याकडून १० टक्केप्रमाणे तीन लाखांचे कर्ज घेतले होते. त्यापैकी दोन लाख रुपये हरिणखेडे यांनी परत केले होते. आज उर्वरित पैसे घेण्यासाठी सोनू सरदार हरिणखेडे यांच्या घरी गेला. संपूर्ण कर्ज आजच परत करा असा त्याचा आग्रह होता. यावेळी जसबीर आणि हरिणखेडे कुटुंबीयात वाद झाला. तेंव्हा जसबीरने आपल्या गाडीच्या डिकीत ठेवलेल्या बाटलीमधून पेट्रोल काढून पीयूष आणि कल्पना यांच्यावर टाकून पेटवून दिले. यात जसबीरही किरकोळ भाजला. पण तो तिथून पळून गेला.
या घटनेमुळे आरडाओरडा झाला. तेंव्हा शेजारचे धावून आले आणि त्यांनी या दोघांना वाचवले. घरात लागलेली आगही विझवण्यात परिसरातील नागरिकांना यश आले. हे सर्व प्रकरण कर्जाने घेतलेल्या पैशाच्या वादातून घडले. हरिणखेडे यांनी कर्जाचे अर्धे पैसे परत केले. पण तरीही जसबीरने त्यांच्या कुटुंबीयांवर जीवघेणा हल्ला केला.
या घटनेत जखमी झालेल्या कल्पना व पीयूष हरिणखेडे यांच्यावर स्थानिक खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पैसे देण्याचे कबूल केल्यानंतरही त्यांनी हा जीवघेणा केल्याने त्याच्यावर कठोर कारवाई व्हावी, अशी अपेक्षा हरिणखेडे कुटुंबाने व्यक्त केली आहे. पोलिसांनी पंचनामा केला असून अवैध सावकारी करणाऱया सोनू भाटिया यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. घटनास्थळाला उपविभागीय पोलीस अधिकाऱयांनी भेट देत परिस्थितीची पाहणी केली.