चंद्रपूर - जर तुम्ही खुल्या बाजारातून चिप्स, फरसाण आणि इतर पॅक केलेले खाद्यान्न विकत घेत असाल तर सावधान. कारण असे एक्सपायरी झालेले खाद्यान्न आता शहरात विकण्यात एक रॅकेट सक्रिय असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. जे पदार्थ मनपाच्या कचरा व्यवस्थापन केंद्रावर फेकून देण्यात येतात त्याचाच उपयोग यासाठी करण्यात येतो, ही बाब त्याहूनही गंभीर आहे. मनपाच्या काही कर्मचाऱ्यांच्या मदतीने हा सर्व प्रकार सुरू असल्याचे समोर आले आहे. आज काही जागरुक नागरिकांनी याचा पर्दाफाश केला. जे एक्सपायरी झालेले चिप्स आणि फरसाणचे पाकिट कचरा केंद्रात विल्हेवाट लावण्यासाठी आले. काही वेळात तेच पदार्थ दुसऱ्या वाहनाने केंद्राच्या बाहेर जाताना पकडण्यात आले. यामुळे सामान्य नागरिकांच्या आरोग्याच्या सुरक्षेचा गंभीर मुद्दा चर्चेला आला आहे.
चंद्रपूर महानगरपालिकेचे कचरा व्यवस्थापन केंद्र हे अष्टभुजा वॉर्ड येथे आहे. शहरातुन गोळा केलेला सर्व कचरा, घाण येथे टाकली जाते. येथे यावर प्रक्रिया केली जाते. मात्र, मनपाच्या काही भ्रष्ट कर्मचाऱ्यांच्या मदतीने येथे एक वेगळेच रॅकेट सक्रिय झालेले आहे. येथे टाकण्यात आलेल्या कचऱ्याचा उपयोग बाहेर विकण्यासाठी केला जातोय. यापूर्वी हा प्रकार समोर आला होता. अन्न व औषध विभागाने पकडलेल्या लाखों रुपयांचा तंबाखूजन्य माल नष्ट करण्याचे निर्देश न्यायालयाने दिले होते. त्यानुसार मनपाच्या कचरा व्यवस्थापन केंद्राच्या परिसरात मोठा खड्डा खोदून त्याची रीतसर विल्हेवाट लावण्यात आली. मात्र, त्याच्या काही दिवसांतच जेसीबीने खोदून हा माल काढण्यात आला आणि तो खुल्या बाजारात विकण्यात देखील आला. हा संपूर्ण प्रकार येथे कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांच्या परवानगीशिवाय शक्य नाही. ही तक्रार अन्न औषध विभागाला मिळाली. त्यानुसार त्यांनी मनपा प्रशासनाला सूचना केल्या. मात्र, या सूचनेला केराची टोपली वरीष्ठ अधिकाऱ्यांनी दाखवली. त्यानंतर तर या भ्रष्ट कर्मचाऱ्यांना मोकळे रान मिळाले. मात्र, येथे येणाऱ्या प्रत्येक वस्तूचा बाजार होऊ लागला. ईटीव्ही भारतच्या हाती जी माहिती लागली ती तर आणखी धक्कादायक आहे. जी फळे फळविक्रेते फेकून देतात अशी चांगली दिसणारी फळे देखील गोळा करून बाजारात विकली जाऊ लागली आहेत. नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने ही बाब अतिशय गंभीर आहे. याचा भांडाफोड आज झाला. आज सकाळी या कचरा केंद्रावर मोठ्या प्रमाणात एक्सपायरी झालेले खाद्यपदार्थांची पाकिटे विल्हेवाट लावण्यासाठी टाकण्यात आली. हीच पाकिटं काही वेळात तीन ऑटो भरून बाहेर जात होती. त्यातील एक ऑटोला काही जागरूक नागरिकांनी पकडले. तपासणी केली असता ही सर्व पाकिटे यात आढळली. कसून चौकशी केली असता ही पाकिटे आपण बाहेर विकण्यासाठी नेत असल्याची धक्कादायक कबुली ऑटोरिक्षाचालक आणि त्यात बसलेल्याने दिली.
मनपाचे सातपुते आणि शेंद्रेचा आशीर्वाद -
इतका गंभीर प्रकार येथे कर्तव्यावर असलेल्या कर्मचाऱ्यांच्या आशीर्वादाशिवाय शक्य नाही. पकडण्यात आलेल्या व्यक्तींना काही लोकांनी चोप दिल्यावर त्यांनी मनपा कर्मचाऱ्यांच्या म्हणण्यानुसार आम्ही हे काम करीत असल्याचे कबुल केले. येथे तैनात असलेले स्वछता निरीक्षक सातपुते आणि जगदीश शेंद्रे हेच रॅकेट चालवत होते असे समोर आले. मात्र, प्रत्यक्षात हे रॅकेट त्याही पेक्षा मोठे आहे. यात सामील असणारी नावे ही मोठी असण्याची दाट शक्यता आहे.
कारवाईसाठी पोलिसांची चालढकल -
इतका गंभीर प्रकार समोर आल्यावरही यावर कुठलाही गुन्हा दाखल झाला नाही. यावर आता आश्चर्य व्यक्त केले जात आहे. पोलीस ठाण्याच्या हद्दीवरून रामनगर आणि शहर पोलीस ठाणे ही जबाबदारी एकमेकांवर ढकलत आहे. शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अंभोरे यांनी ही हद्द रामनगर पोलीस ठाण्याची असल्याचे स्पष्ट केले. रामनगर येथील पोलीस उपनिरीक्षक पाटील यांच्याशी संपर्क साधला असता ही हद्द शहर पोलीस ठाण्यात येत असल्याचे सांगितले. त्यामुळे कारवाई देखील शहर पोलीस करतील असे सांगितले. मात्र, जेव्हा अन्न व औषध विभागाचे पथक घटनास्थळी पोचले त्यावेळी रामनगर पोलीस ठाण्याशी संपर्क करण्यात आला. त्यांचे कर्मचारी देखील तिथे पोचले. नागरिकांच्या जीवाशी खेळ असूनही याविरोधात कुठलाही गुन्हा नोंदविण्यात आला नाही. हा परिसर मनपाचा आहे, तेथील मालाची तस्करी होत असेल तर त्यावर अन्न व औषध विभाग कारवाई करण्यासाठी कुठलीही तरतूद कायद्यात नाही. मात्र, सूचना मिळाल्याने आम्ही हा सर्व माल जप्त केला असून पुढील चौकशी सुरू आहे, अशी माहिती देण्यात आली. मात्र, यावर कुठलीही ठोस कारवाई न झाल्याने या प्रशासकीय यंत्रणेवर नेमका कोणाचा दबाव आहे. कोण कुणाला वाचवन्याचा प्रयत्न करतय असे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.