चंद्रपूर - मुख्य प्रधान वनसंरक्षकांच्या पत्रानुसार चंद्रपूर आणि गडचिरोली येथील ( Chandrapur Elephant Transferd ) १३ हत्तींचे स्थानांतरण करण्याचे आदेश वनविभागाला देण्यात आलेले आहे. मात्र, या निर्णयाचा वन्यजीवप्रेमी आणि पर्यावरणाशी संबंधित संघटनांकडून विरोध होत आहे. याबाबत ग्रीन प्लॅनेट सोसायटीच्यावतीने मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना पत्र लिहून हे स्थानांतर थांबविण्याची मागणी करण्यात आली आहे.
काय लिहिले आहे पत्रात -
राज्यातील प्रधान मुख्य वनसंरक्षक यांनी २३ नोव्हेंबर 2021 ला ताडोबाचे क्षेत्र संचालक आणि गडचिरोलीचे वनसंरक्षक यांना पत्र लिहून तेथील १३ हत्तींचे स्थानांतरण जामनगर, गुजरातच्या राधेकृष्ण टेम्पल वेल्फेअर ट्रस्टला सुपूर्द करण्याची प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत. हे आदेश देताना त्यांनी १) प्रोजेक्ट एलेफंट डीविझन, केंद्रीय पर्यावरण मंत्रालय दिल्ली, २) सेन्ट्रल झु एथोरीटी, केंद्रीय वन, पर्यावरण मंत्रालय, दिल्ली ३) राधेक्रीष्ण टेम्पल एलेफंट वेल्फेअर ट्रस्ट,गुजरात आणि ४) महाराष्ट्र शासनाची १३ हत्ती स्थानांतरण करण्यासाठीच्या परवानगीचे पत्रांचा संदर्भ देण्यात आला आहे. राज्य वन्यजीव विभागाचे मते हे सर्व हत्ती निरुत्पादक आणि अप्रशिक्षित (Unproductive & untrained ) आहेत असे म्हटले आहे. इथे महाराष्ट्रात ताडोबा आणि गडचिरोली येथे हत्तींची काळजी घ्यायला, त्यांना खायला वनविभागाकडे पैसे नाहीत, त्यांची काळजी घ्यायला पुरेसे कर्मचारी नाहीत, असे म्हटले आहे. मात्र, या निर्णयाला विविध सामाजिक संघटनांनी विरोध केला आहे. ग्रीन प्लॅनेट सोसायटीच्यावतीने याविरोधात थेट पत्र लिहिण्यात आले आहे.
या आहेत मुख्य मागण्या -
- नैसर्गिक अधिवास
प्राचीन काळापासून गडचिरोली, चंद्रपूर आणि विदर्भ हा हत्तींचा मूळ अधिवास आहे. गोंड राज्यांच्या राजचिन्हावर हत्ती आहे. तसेच इतर राज्यांच्या काळात येथील रानटी हत्तींचा युद्धात उपयोग होत असे. अधून मधून गडचिरोलीत जंगली हत्ती येत असतात. त्यामुळे चंद्रपूर आणि गडचिरोली येथील पाळीव हत्ती या अधिवासात सुरक्षित राहू शकतात. हे हत्ती महाराष्ट्रातील वनात असणे हे अभिमानास्पद आहे. म्हणून त्यांना इथेच नैसर्गिक अधिवासात राहू द्यावे.
- पर्यटनाला वाव
१९६२ साली गडचिरोली जिल्ह्यात वनविभागाच्या कामासाठी हत्ती कॅम्प स्थापन करण्यात आला होता. इतका सुंदर आणि मोठा प्राणी अलीकडे हत्तींचे काम नसल्याने वन विभागाला नकोसा झाला आहे. परंतु जेव्हापासून हत्ती कॅम्पमध्ये आहेत, तेव्हापासून इथे विदर्भातील आणि तेलंगणातील नागरिक हत्ती पर्यटनाला येथे येत असतात. इथे पर्यटन विकास केला, तर हत्तीसाठी पुरेसे मनुष्यबळ आणि आर्थिक मदत सहज उपलब्ध होऊ शकते. चंद्रपूर जिल्ह्यात ताडोबा हे जसे वाघांसाठी प्रसिद्ध आहे, तसेच हत्ती पाहण्यासाठी सुद्धा पर्यटक उत्सुक असतात. गडचिरोली जिल्ह्यातील मोठे जंगल पाहता आदिवासी विकास करायचा असेल तर जील्ह्यात व्याघ्र प्रकल्प, हत्ती पार्क आणि अभयारण्य घोषित केले पाहिजे. पर्यटनातून येणाऱ्या पैशावर हत्तींचे संरक्षण, कर्मचारी आणि ओषध उपचार सहज करता येईल.
- नक्षलवादाकडून विकासाकडे
गडचिरोली येथील नागरिक अनेक वर्षापासून नक्षल समस्येमुळे त्रस्त होते. तसेच येथील लोक वन्यजीव संरक्षनाप्रती फारसे उत्सुक नव्हते. परंतु हत्तीच्या संरक्षणासाठी जिल्ह्यातील आणि कमलापुरचे सर्व आदिवासी आणि नागरिक एकत्र आले आणि त्यांनी स्थानांतराला विरोध दर्शविला आहे. लोकांचे हत्ती आणि वन्यजीव प्रेम पाहून या संधीचा उपयोग करून येथील सर्व हत्ती येथेच राहू द्यावे.
- वन्यजीव-मानव संघर्ष कमी होईल
गडचिरोलीत वन्यजीवांच्या सर्वाधिक शिकारींच्या घटना घडत असत. परंतु वनविभागाच्या सतर्कतेने आणि लोकांच्या जागरूकतेने येथील घटना कमी होऊन लोकांना वण्यजीवाचे संरक्षण करून पर्यटन विकास व्हावा, असे वाटू लागले. ताडोबा, आलापल्ली आणि सिरोंचा वनविभागात पर्यटक आणि आदिवासी हत्ती पाहण्यासाठी येवू लागले आहेत. आज येथील हत्तांचे स्थानातरण होताना सर्व ग्रामीण, आदिवासी, नागरिक आणि वन्यजीव संस्था एकत्र येवून विरोध करू लागल्या आहेत. हत्ती येथेच संरक्षित ठेवल्यास येथील पर्यटन वाढेल आणि वन्यजीव मानव संघर्ष कमी होण्यास मदत होईल.
- खासगी संस्थेला हत्ती का द्यावे
हत्ती हे वनविभागासाठी अभिमानास्पद असताना, शासनाने हत्ती आर्थिक दृष्ट्या परवडत नाही म्हणणे ही बाब लाजिरवाणी आहे. त्यातही हत्ती एका खासगी प्राणी संग्रहालयाला देणे हेसुद्धा योग्य नाही. ज्या राज्यात जास्त हत्ती आहेत ते त्यांना देतील. त्यामुळे देशात महाराष्ट्राची मान खाली होते आहे. तेव्हा महाराष्ट्र शासनाने हे हत्ती चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यातच ठेवून त्यांचा वनविभागाच्या कामासाठी तसेच पर्यटनासाठी उपयोग करावा.
- हत्ती महाराष्ट्राला अभिमान
हत्ती सारख्या भव्य आणि दिमाखदार प्राणी महाराष्ट्रात असणे ही अभिमानाची बाब आहे. ते उपयोगाचे नाही, कामाचे नाही, वृद्ध आणि आजारी असतात असे वन्यजीव विभागाने म्हणणे योग्य नाही. उलट या हत्तींचा वनविभागाच्या कामात आणि पर्यटनासाठी निश्चित उपयोग करून घ्यावा. गडचिरोली जिल्यातील हत्तींना इतर राज्यात, खासगी संस्थेला, प्राणी संग्राहलयात बंदिस्त ठिकाणी नेण्यास आमचा विरोध असून ते हत्ती इथेच नैसर्गिक वातावरणात ठेवावे, त्यातून पर्यटन विकास करावा आणि हत्तींचे शासनाच्यावतीने संवर्धन व्हावे, अशी मागणी करीत ग्रीन प्लॅनेट सोसायटीच्यावतीने करण्यात आली आहे.