चंद्रपूर - शाळेत विध्यार्थ्यांची उपस्थिती वाढावी यासाठी मध्यान्न भोजन योजना राबविली जाते. दुपारच्या सुट्टीत विद्यार्थ्यांना जेवण दिले जाते. जेवणासाठी लागणारे साहित्य कंत्राटदार पुरवीत असतो. राजुरा तालुक्याच्या काढोली (बु.) येथील साईनाथ विद्यालयामध्ये पुरवठा करण्यात आलेले मीठ निकृष्ट दर्जाचे निघाले आहे. 'टॉप कूक' नावाची मिठाची कंपनी असून, ती गुजरातस्थीत आहे. मध्यान्ह भोजनाच्यावेळी पाण्यात मीठ टाकल्यानंर मिठाचा रंग बदलत असून, पाण्यावर तवंग येत असल्याची तक्रार शाळेच्या मुख्याध्यापकांनी शिक्षण विभागाकडे केली आहे.
हेही वाचा - महिला दिन विशेष: गॅरेज व्यवसायात तिनं निर्माण केलं स्वत:चं अस्तित्व....
राजुरा तालुक्यामध्ये गोंदिया येथील एक खासगी कंपनी शाळांना मध्यान्ह भोजनाचे साहित्य पुरवते. नुकतेच 17 फेब्रुवारीला पुरविण्यात आलेल्या साहित्यातील मीठ निकृष्ट दर्जाचे निघाले आहे. पुरवठा करण्यात आलेल्या मिठाचे पाकीट ४०० ग्रॅमचे आहे. मीठ पाण्यात टाकले असता पूर्णपणे न विरघळता पाण्याला काळपट रंग येत आहे. पाण्यावर चुन्याच्या स्फटिकासारखे मूलद्रव्य तरंगत असल्याचे दिसून येत आहे. निकृष्ट दर्जाचे मीठ आढळल्यामुळे पुरवठा करणाऱ्या कंत्राटदारावर कडक कारवाई करण्यात यावी, अशी तक्रार शाळेच्या मुख्याध्यापकांनी शिक्षणाधिकाऱ्यांकडे केली आहे.
"निकृष्ट दर्जाच्या मीठामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम झाल्यास त्याला जबाबदार कोण? ज्या कंत्राटदाराने विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ खेळण्याचा प्रयत्न केला त्यांच्यावर कडक कारवाई करून त्यांच्याकडून कंत्राट काढून घ्यावे."
- रामदास गिरडकर (सरकार्यवाहक म. रा. शि. परिषद)
"मीठ स्वयंपाकात वापरण्यास योग्य आहे की, नाही यासंबंधी चौकशी सुरू असून, अहवाल येईपर्यंत मीठाचा वापर न करण्यासंबंधी सूचना केल्या आहेत.
- विजय परचाके, गटशिक्षणाधिकारी (राजुरा)