चंद्रपूर - बल्लारपूर विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेसे उमेदवार डॉ. विश्वास झाडे यांनी ईटीव्ही भारतला दिलेल्या विशेष मुलाखतीत मतदारसंघ आणि राज्यातील अनेक मुद्द्यांवर सडेतोड भाष्य केले आहे. डॉ. विश्वास झाडे हे राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या विरोधात निवडणूक लढत आहेत. मागील पाच वर्षात सरकारने कोणतेही ठोस काम केले नाही, तसेच विरोधी उमेदवाराने कोणतेही काम केले नसून सरकारचा हाच नाकर्तेपणा घेऊन आपण जनतेपूढे जाणार, असे वक्तव्य विश्वास झाडे यांनी केले आहे.
हेही वाचा... 'मागच्या ५ वर्षात १४ हजार शेतकऱ्यांच्या आत्महत्या, सरकारला मात्र देणं-घेणं नाही'
मागील पाच वर्षांत राज्याचा विकास करण्यात भाजप सरकार सपशेल अपयशी ठरले आहेत. चंद्रपूर जिल्ह्यातही हीच स्थिती कायम आहे. मुनगंटीवार यांचे समर्थक विकासाचा दावा करत आहेत. मात्र, ही जनतेची शुद्ध फसवणूक आहे. एकही मोठा उद्योग मुनगंटीवार यांनी बल्लारपूर येथे आणला नाही. उलट सुरू असलेले उद्योग बंद पडले आहेत. बसस्थानकाची स्थिती चांगली असताना त्याला पाडून नवे बसस्थानक निर्माण करण्यात आले तर बसेसची स्थिती भंगाराप्रमाणे झाली आहे. हा कुठला विकास आहे? असा सवाल डॉ. झाडे यांनी उपस्थित केला.
हेही वाचा... करून गेलं गाव अन् भलत्याचं नाव, अशी सध्याची भाजपची अवस्था - पवार
बल्लारपूर विधानसभा क्षेत्रातून अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या विरोधात काँग्रेसने डॉ. विश्वास झाडे यांना उमेदवारी दिली आहे. यावर बराच वाद निर्माण झाला होता. यावर डॉ. झाडे यांनी स्पष्टीकरण दिले आहे. आपण महाविद्यालयीन जीवनापासून काँग्रेसशी जुळलो आहोत. त्यामुळेच आपल्याला उमेदवारी देण्यात आली असे ते म्हणाले.