चंद्रपूर – राज्यातील सातारा, लातूरसह इतर जिल्ह्यांप्रमाणे चंद्रपूर शहरातही कडकडीत टाळेबंदी घोषित करण्यात आली आहे. दोन टप्प्यात राबविण्यात येणारी ही टाळेबंदी 26 जुलैपर्यंत असणार आहे. त्यामुळे आज टप्प्याटप्यात सुरळीत होणारे जनजीवन पूर्णपणे ठप्प झाले.
टाळेबंदीत जीवनावश्यक वस्तूची दुकाने व भाजीपाला मंडईतील विक्रीवर बंदी लागू करण्यात आली आहे. पुढील चार दिवसही जीवनावश्यक वस्तुंच्या विक्रीवरही निर्बंध येणार आहेत. त्यानंतर पुढील पाच दिवसांसाठी थोडी शिथिलता देण्यात येणार आहे.
कोरोनाच्या संसर्गावर नियंत्रण आणण्याचे आव्हान-
जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या गेल्या काही दिवसांपासून झपाट्याने वाढत आहे. विशेषत: चंद्रपूर शहरात संसर्ग होवून वाढलेल्या कोरोना रुग्णांची संख्या जास्त आहे. यावर नियंत्रण आणण्यासाठी जिल्हा प्रशासनाने पुढील दहा दिवस चंद्रपूर, दुर्गापूर आणि उर्जानगर येथे टाळेबंदी घोषित केली आहे. या ठिकाणी पहिल्या पाच दिवस बाजारपेठ आणि जीवनावश्यक वस्तूंची दुकानेदेखील बंद असणार आहेत. टाळेबंदीच्या पहिल्या दिवशी नागरिकांनी नियमांचे पालन केलेले दिसून आले. सर्व दुकाने आणि बाजारपेठ बंद ठेवण्यात आले. तसेच शहरांबाहेरून येणाऱ्या नागरिकांची तपासणी केली जात आहे.
टाळेबंदीमुळे वर्दळीच्या ठिकाणी शुकशुकाट दिसून येत आहे. कोरोनाला रोखण्यासाठी ही स्थिती अत्यंत आवश्यक असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. टाळेबंदीत नागरिकांनी नियमांचे पालन केल्यास कोरोना रुग्णांची वाढती संख्या नियंत्रित होण्याची शक्यता आहे. यानंतर जिल्ह्यातील अन्य भागातही टाळेबंदी लागू होवू शकते, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.
आरोग्य विभागाने दिलेल्या आकडेवारीनुसार 16 जुलैपर्यंत जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या 218 होती. यापैकी 120 जण कोरोनामुक्त झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सोडण्यात आले आहे.