राजुरा (चंद्रपूर) - घर कामात महिला व्यग्र असताना अचानक चितळाने घरात प्रवेश केला. या प्रकाराने महिला गोंधळली. काही कळायच्या आतच चितळाने महिलेवर हल्ला केला. ही महिला कशीबशी घराबाहेर पडली आणि दार बंद करून घेतले. जवळपास सहा तास चितळ घरात आणि घरातील माणसे बाहेर अशी परिस्थिती होती.
हा अजब प्रकार गोंडपिपरी तालुक्यातील वटराणा गावात बुधवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास घडला. दरम्यान, जखमी निर्मला श्रीपद गेडाम (वय 65) या महिलेला उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले, तर चितळाला सहा तासांनी जंगलात सोडण्यात आले.
तत्पूर्वी, चितळ घरातच अडकून पडले आहे, हे समजताच गावकऱ्यांनी वनकर्मचाऱ्यांना भ्रमणध्वनीने संपर्क साधला. घडलेल्या प्रकाराची माहीती दिली. वनरक्षकांनी लगबगीने गाव गाठले. सहा तासानंतर चितळाला जंगलात सोडण्यात आले.
वन्यजीवांचे मनुष्यवस्तीत येण्याचे प्रमाण वाढले आहे. गोंडपिपरी तालुक्यातील ही पाचवी घटना आहे. काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र-तेलंगाणा सीमेवरील पोडसा गावानजीक एका चितळाचा दुर्दैवी मृत्यू झाला.
वन्यजीवांचा बंदोबस्त करा...!
सध्या शेतीचा हंगाम सुरू आहे. कपाशीची पाने खाण्यासाठी तृणभक्षक प्राणी शेतात येत आहेत. मोकाट कुत्रे मागे लागले की, वन्यजीव गावात शिरकाव करीत आहेत. सतत घडणाऱ्या या प्रकारांमुळे गावकरी चांगलेच धास्तावले आहेत.
वटराणा येथील गावकऱ्यांनी वन्यजीवांचा बंदोबस्त करा, अशी मागणी लावून धरल्यामुळे चितळाला जंगलात सोडण्यास उशीर झाला.