चंद्रपूर - जिल्हा परिषदेच्या नराधम शिक्षकाने आपल्याच वर्गातील 7 चिमुकल्या विद्यार्थिनींवर अत्याचार केल्याने खळबळ उडाली होती. ही घटना जीवती परिसरातील एका गावात जिल्हा परिषदेच्या शाळेत घडली. या नराधम शिक्षकाच्या पोलिसांनी मुसक्या आवळून न्यायालयात हजर केले. त्याला न्यायालयाने तीन दिवसाची पोलीस कोठडी ठोठावली आहे.
दुर्गम परिसरातील जिल्हा परिषद शाळेत असा घडला निंदनीय प्रकार - जीवती या दुर्गम परिसरातील एका गावात जिल्हा परिषदेच्या शाळेतील चिमुकल्यांवर अत्याचार केल्याने खळबळ उडाली होती. शाळेतील शिक्षक अच्छुत खोबाजी राठोड हा चिमुकल्यांना पेपर तपासणी करण्याच्या नावाखाली कार्यालयात बोलावून विकृतपणे अत्याचार केले. चिमुकल्या विद्यार्थिनींवर लैंगिक छळ केला. संतापजनक म्हणजे मागील वर्षभरापासून या नराधमाने तब्बल 7 मुलींवर अत्याचार केल्याचे समोर आले आहे. काही पीडित मुलींनी ही बाब आपल्या आईना सांगितली. क्षणाचाही विलंब न करता आईने शिक्षकाविरुद्ध जीवती पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीची गंभीर दखल घेत पोलीस उपविभागीय अधिकारी सुशील कुमार नायक यांनी तात्काळ गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. त्यामुळे या नराधमावर जीवती पोलीस ठाण्यात भादवी कलम 354 (अ), 376, (अ) 376(2) (न) भादवी सह. 4, 6, 8, 12 बाललैंगिक अपराधापासून संरक्षण कायद्यानुसार ( पास्को ) गुन्हा दाखल करुन अटक केली.
आरोपी शिक्षकाला न्यायालयात हजर केले असता, त्याला तीन दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. तपासात काही अडचण आली तर आम्ही न्यायालयाला पोलीस कोठडी वाढविण्याची मागणी करू, अशी माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी सुशीलकुमार नायक यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना दिली आहे.