चंद्रपूर - संचारबंदीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर आतापर्यंत दंडात्मक कारवाई करून सोडून दिले जायचे. मात्र, अशा व्यक्तींना न्यायालयाने शिक्षा सुनावल्याची पहिली घटना चंद्रपूर जिल्ह्यात घडली आहे. जिल्ह्यातील गोंडपिंपरी तालुका न्यायालयाने ही शिक्षा सुनावली आहे. संचारबंदीचे नियम मोडणाऱ्याला न्यायालयात हजर केले असता त्याला दीड हजारांचा दंड ठोठावण्यात आला आहे. न्यायालयाने अशा प्रकारची शिक्षा देण्याची राज्यातील ही पहिलीच वेळ असल्याचे बोलले जात आहे.
पहिल्यांदाच संचारबंदीच्या नियमांचे उल्लंघन प्रकरणात न्यायालयाने शिक्षा सुनावली आहे. 26 एप्रिलला धाबा पोलिसांनी एकूण तीन जणांवर कारवाई केली होती. त्यापैकी एकाला शुक्रवारी गोंडपिंपरी तालुका न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी न्यायालयाने आरोपीला शिक्षा सुनावली. तोंडाला मास्क न लावणे, टाळेबंदीचे उल्लंघन या प्रकरणी दीड हजारांचा दंड आरोपीला ठोठावण्यात आला.
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी 24 मार्चपासून देशात संचारबंदी लागू करण्यात आली. यावेळी जीवनावश्यक सेवा वगळता अन्य कारणासाठी बाहेर निघण्यास मज्जाव करण्यात आला होता.बाहेर निघताना तोंडावर मास्क लावणे, फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करने हे सुद्धा अनिवार्य करण्यात आले. याचे पालन न करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जायची. तसेच पोलीस विभागाकडून देखील अशा लोकांवर कारवाई करण्यात आली. मात्र, अशी प्रकरणे कधी न्यायालयापर्यंत गेली नव्हती.