चंद्रपूर - विवाह सोहळ्यात गाजावाजा आणि पैश्याची सर्रास उधळण होते. मात्र, नांदा येथील जमदाडे कुटुंबीयांनी लग्न समारंभात एक वेगळा उपक्रम राबवला. त्यांनी विवाह सोहळ्यातील स्वागत समारंभात आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांचे कुटुंब, निराधार लोकांना मदत करणाऱ्या संस्था, विविध शाळांना 20 हजार रुपयांची मदत केली. मंडपामध्ये सामाजिक संदेश देणारे फलकही लावण्यात आले.
चंद्रपूर जिल्ह्यातील नांदा येथील सतीश जमदाडे आणि आरती राऊत हे विवाह बंधनात अडकले. आपल्या समाजाला प्रबोधनाची गरज आहे ही बाब लक्षात घेऊन त्यांनी सामाजिक संदेश देण्याचे ठरवले. रक्तदान महादान, बेटी बचाओ बेटी पढाओ, पर्यावरण वाचवा, स्वच्छ भारत, अवयवदान, विद्यादान असे अनेक फलक सभारंभात लावण्यात आले होते.
हेही वाचा - अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी साहित्य नगरी सज्ज
विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या लोकांचा थोर पुरुषांचे फोटो आणि ग्रामगीता देऊन गौरव करण्यात आला. कवी रामकृष्ण रोगे, स्मार्ट ग्राम बिबी गावचे उपसरपंच आशिष देरकर, विविध सामाजिक उपक्रम राबवणारे पुरुषोत्तम निब्रड, समाजसेवक रामानंद आगे, पत्रकार रत्नाकर चटप, प्रगतीशील शेतकरी अंकुश धाबेकर आणि ग्रामीण पत्रकार संघाचे अध्यक्ष दिपक खेकारे यांचा गौरव केला. एचएमटी तांदळाचे जनक दादाजी खोब्रागडे यांचा मुलगा मित्रजित खोब्रागडे यांचाही सत्कार केला.