चंद्रपूर - ब्रह्मपुरी शहरातील ख्रिस्तानंद दवाखान्यालगत असलेल्या प्रवाशी निवार्यात उपचाराविनाच एका कोरोनाबाधिताचा तडफडून मृत्यू झाला. विशेष म्हणजे, राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांचा हा मतदारसंघ आहे.
हेही वाचा - खर्रा खाणाऱ्या मित्रांना कोरोनाची बाधा; एकाच वेळी सहा जण पॉझिटिव्ह
मृतक नागपूर जिल्ह्यातील कूही तालुक्यातील आंबोरा येथील असून तेथील डॉक्टरांनी त्याला ब्रह्मपुरी येथे रेफर केले होते. मृत व्यक्तीची पत्नी त्यास खासगी वाहनाने ब्रह्मपुरी येथे घेऊन आली. मात्र, ब्रह्मपुरी येथील दवाखान्यात उपचारासाठी बेड उपलब्ध नव्हते. ऑक्सिजन नसल्याने या व्यक्तीवर उपचार होऊ शकले नाही. इतरत्र धावपळ करूनही उपचार होऊ शकले नाही. हताश झालेली मृत व्यक्तीची पत्नी त्यासह ब्रह्मपुरी ख्रिस्तानंद चौकातील प्रवाशी निवारा येते होती. अशातच तिच्या पतीचा उपचाराविना मृत्यू झाला.
सर्व यंत्रणांना पाचारण करून अंत्यविधी करण्यात आला
प्रशासनाला माहिती मिळताच क्षणाचा विलंब न लावता ते घटनास्थळी पोहोचले. लगेच सर्व यंत्रणेला पाचारण करून मृत व्यक्तीचे अंत्यविधी करण्यात आले. यापूर्वी पहिल्या लाटेत ब्रम्हपुरी तालुक्याची हीच स्थिती होती. मात्र, दुसऱ्या लाटेत देखील आरोग्य यंत्रणा सक्षम होऊ शकली नाही. आज नागरिकांना बेड मिळेनासे झाले आहेत. ऑक्सिजनची सुविधा अनेक ठिकाणी नाही. अशावेळी रुग्णांचे हाल होत आहेत. विशेष म्हणजे, हा राज्याचे आपत्ती व्यवस्थापन मंत्री विजय वडेट्टीवार यांचा मतदारसंघ आहे. ज्यांच्याकडे राज्याची जबाबदारी आहे त्यांच्या स्वतःच्या मतदारसंघात एका कोरोनाच्या रुग्णाचा उपचाराअभावी मृत्यू होतो, हे चित्र दुर्दैवी आहे.
टीव्हीवर चर्चा करण्यापेक्षा आपल्या मतदारसंघाकडे लक्ष द्या - आप
ब्रह्मपुरी तालुका हा पालकमंत्री, तसेच मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांचा मतदारसंघ आहे. या भागात मोठ्या प्रमाणावर कोरोनाबाधित निघत असतानाही स्थानिक नगर प्रशासन पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांचेकडून कोणतीही सुधारणा होताना दिसत नसल्याचा आरोप आम आदमी पार्टीचे चंद्रपूर जिल्हा उपाध्यक्ष विजय सिद्धावार यांनी केला आहे. मागील एका आठवड्यात 529 कोरोनाबाधित निघाल्याने तालुक्यात चिंतेचे वातावरण आहे. मात्र, या क्षेत्राचे प्रतिनिधित्व करणारे मंत्री विजय वडेट्टीवार याकडे लक्ष न देता मुंबईच्या लोकलबद्दलच टीव्हीवर चर्चा करताना दिसत असल्याचा आरोप विजय सिद्धावार यांनी केला.
हेही वाचा - चंद्रपुरात चार महिने लोटूनही सुरू नाहीत ऑक्सिजन प्लांट