चंद्रपूर : जिल्ह्यामध्ये आज एकाच दिवशी १२ कोरोनाबाधित रुग्ण सापडले आहेत. यामध्ये एका लग्न सोहळ्यात सहभागी झालेल्या पाच जणांचा समावेश आहे. त्यामुळे एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या १६२ झाली आहे.
आज पुढे आलेल्या बाधितांमध्ये चंद्रपूर शहरातील २१ वर्षीय युवकाचा समावेश आहे. हा युवक सिकंदराबाद येथून १ जुलैला आल्यापासून संस्थात्मक अलगीकरणात होता. इंदिरानगर येथील २१ वर्षीय महिला हैद्राबाद येथून १ जुलै रोजी परत आली होती. दाद महाल वार्डातील आणखी एक २१ वर्षीय महिला पॉझिटीव्ह ठरली आहे. ही महिला जळगाव येथून आल्यानंतर २९ जून पासून संस्थात्मक अलगीकरणात होती. एक रुग्ण भानापेठ वॉर्डमधून पुढे आला असून या 29 वर्षीय युवक हैदराबादवरून परत आला होता. खासगी हॉटेलमध्ये संस्थात्मक अलगीकरणात होता. याशिवाय बिहार राज्यातील पाटणा शहरातून परत आलेल्या ४५ वर्षीय नागरिकाचा समावेश आहे.
वरील पाहिल्या ३ बाधितांची स्वॅब तपासणी ७ जुलैला झाली होती. तर चौथ्या व पाचव्या बाधिताची स्वॅब तपासणी ८ जुलैला करण्यात आली. वरोरा तालुक्यात पाच बाधित पुढे आले आहेत. यामध्ये सोमठाणा पोस्ट टेंभुर्णा येथील 38 वर्षीय महिला, ५० वर्षीय पुरुष, ४८ वर्षीय महिला, ३० वर्षीय पुरुष हे एकाच कुटुंबातील चार जण आहेत. जालना येथे एका विवाह सोहळ्यात हे सर्व सहभागी झाले होते. याच लग्न सोहळ्यात सहभागी झालेल्या २९ वर्षीय भद्रावती शहरातील चारगाव कॉलनीतील पुरुषही पॉझिटीव्ह ठरला आहे. तर वरोरा शहरात २७ वर्षीय पॉझिटिव्ह युवक मध्य प्रदेश मधून परत आला होता. तो गृह अलगीकरणात होता. बल्लारपूर शहरातील ७ वर्षीय मुलगा पॉझिटीव्ह आला आहे. या मुलासह कुटुंबातील ५ सदस्य कारने मुंबईवरून परत आले होते. अन्य चार जण निगेटिव्ह ठरले आहे. मात्र मुलगा पॉझिटिव्ह ठरला आहे.
अशा प्रकारे जिल्हयातील कोरोना बाधित १६२ झाले आहेत. आतापर्यत ८० बाधित बरे झाल्याने सुटी देण्यात आली आहे. त्यामुळे १६२ पैकी रूग्णालयात उपचार घेणाऱ्या बाधितांची संख्या आता ८२ झाली आहे. सर्व बाधितांची प्रकृती स्थिर असून त्यांच्यावर वैद्यकीय उपचार सुरू आहेत.