चंद्रपूर- सिंचन विभागाच्या माध्यमातून पूरग्रस्त विभागाची नव्याने संरचना करण्यात आली आहे. त्यात नगीनबाग आणि वडगाव प्रभागाला समाविष्ट करण्यात आले आहे. त्यानुसार आता सदर क्षेत्रात जुने किंवा नवे असे कुठलेही बांधकाम करण्यास माहाराष्ट्र शासनाने स्थगिती दिली आहे. मात्र, हा अहवाल अत्यंत चुकीच्या पद्धतीने तयार करण्यात आला, असा आरोप करीत जनविकास सेनेचे अध्यक्ष नगरसेवक पप्पू देशमुख यांच्या नेतृत्वात सिंचन विभाग कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. यात कार्यालयासमोर अहवाल नकाशाची होळी पेटवून निषेध करण्यात आला.
चंद्रपूर शहरातील ३० ते ४० टक्के घरे ही इरई नदीला लागून असलेल्या भागात वसलेली आहे. याठिकाणी अनेक ले-आऊटसाठी शासनाकडून मंजुरी सुद्धा आहे. तसेच यापूर्वी केलेल्या हजारो बांधकामांना महानगरपालिकेने परवानगी दिली आहे. त्यामुळे नागरिकांनी मोठ्या प्रमाणात भूखंड खरेदी करून या ठिकाणी घर बांधण्याचे स्वप्न बघितले. परंतु, ही गुंतवणूक आता निष्फळ ठरण्याची शक्यता आहे. याचा मोठ्या प्रमाणात आर्थिक फटका मध्यमवर्गीय सर्वसाधारण लोकांना बसण्याची शक्यता आहे.
नव्याने आखण्यात आलेली पूर रेषा ही चुकीच्या पद्धतीने आखलेली असल्याचा आरोप जन विकास सेनेचे अध्यक्ष व वडगाव प्रभागाचे नगरसेवक पप्पू देशमुख यांनी केला आहे. ब्ल्यू लाईनवर रेड लाईनची आखणी करताना २५ व १०० वर्षाच्या पुराचा इतिहास बघितल्या जातो. वडगाव प्रभागातील लक्ष्मीनगर, आकाशवाणी रोड अशा अनेक ठिकाणी पुराच्या पाण्याचा कधी फटका बसला नाही. मात्र, तरीही हा भाग पूरग्रस्त रेषेच्या आत टाकण्यात आला आहे. इरई नदीचे खोलीकरण व या भागातून वाहणाऱ्या नाल्याचे बांधकाम केल्यास मोठ्या प्रमाणात पुराचा धोका कमी होऊ शकतो. मात्र, असे न करता सरसकट बांधकामावर बंदी आणणे हे चुकीचे आहे, असे देशमुख यांचे म्हणणे आहे. त्यामुळे हा अहवाल त्वरित मागे घ्यावा, अशी मागणी करीत नकाशाची होळी करण्यात आली. मागणीचे निवेदन सिंचन विभागाचे कार्यकारी अभियंता श्री. काळे यांना देण्यात आले.
हेही वाचा- नागभीड येथे आढळला महिलेचा कुजलेला मृतदेह