चंद्रपूर - देशात लोकसभा निवडणुकीचे सर्व टप्पे पूर्ण झाले आहेत. या निवडणुकीचा निकाल २३ मे रोजी लागणार आहे. ही प्रक्रिया पारदर्शी आणि सुरळीतपणे पार पडावी, यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज झाले आहे. निवडणूक प्रक्रियेवर लक्ष ठेवण्यासाठी भारतीय निवडणूक आयोगाने निरीक्षकांची नेमणूक केली आहे. जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांच्या नेतृत्वाखाली वरिष्ठ सनदी अधिकारी दिपांकर सिन्हा व जे. पी. पाठक यांनी ईव्हीएम मशीन व व्हीव्हीपॅट ठेवण्यात आलेल्या बंद गोदामाची, मतमोजणी यंत्रणेची पाहणी केली.
मतमोजणीचे ठिकाण वखार महामंडळ येथे त्रिस्तरीय सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या सशस्त्र दलाच्या तुकडीकडे या स्थळाची सुरक्षा व्यवस्था असून या ठिकाणी परवानगीशिवाय कोणालाही प्रवेश नाही. प्रत्यक्ष मतमोजणी प्रक्रियेमध्ये मतमोजणी सहायक, मतमोजणी पर्यवेक्षक, सुक्ष्म निरीक्षक अशा ३२८ कर्मचाऱयांचा सहभाग आहे. तर परिसरात पाचशे पोलीसांचा बंदोबस्त करण्यात आला आहे.
यामध्ये चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातअसलेल्या ६ विधानसभा मतदारसंघामध्ये प्रत्येक विधानसभा मतदारसंघ क्षेत्रासाठी नेमून दिलेल्या मतमोजणी हॉलमध्ये १४ टेबल राहणार आहे. याकरीता ३२८ कर्मचारी व प्रत्येक टेबलासाठी राजपत्रित दर्जाचे मतमोजणी पर्यवेक्षक व मतमोजणी सहाय्यक राहणार आहे. प्रत्येक हॉलकरिता अतिरिक्त सूक्ष्म निरक्षक देण्यात येणार आहे. निकाल अचूक असल्याबाबत पर्यवेक्षकाने भरलेला नमुना १७ सी भाग २ च्या आकडेवारीशी तपासून अचूक असल्याची खात्री करतील. प्रत्येक फेरीचे निकालपत्र निवडणूक निर्णय अधिकारी सोबत तपासून समिक्षा करून घेतील. सकाळी ८ वाजता ईव्हीएम मशीन प्राप्त झाल्यानंतर मतमोजणीला सुरुवात होणार आहे. सुरुवातीला पोस्टल बॅलेट पेपर पासून मोजन्यात येईल. त्यानंतर ईव्हीएम आणि सर्वात शेवटी व्हीव्हीपॅटमधील चिठ्ठया मोजल्या जाणार आहे. जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी दिलेल्या माहितीनुसार प्रत्येक विधानसभा क्षेत्रातील पाच व्हीव्हीपॅट मशीन मधील चिठ्ठयांची मोजणी प्रत्येक मतदार संघातील प्रातिनिधीक निवड पध्दतीने केली जाणार आहे. त्यानंतर निकाल घोषित केल्या जाणार आहे.