चिमूर (चंद्रपूर ) - पोलीस मागावर असल्याची चाहुल लागताच अवैध दारूची तस्करी करणारे स्कॉर्पियो गाडी एमआयडीसी परिसरात सोडून पसार झाले. पोलिसांनी घटनास्थळावरून ३२ खोक्यात असलेला ३ लाख ७ हजार २०० रुपयाचा अवैध दारूसाठा जप्त केला आहे. वाहनाची किंमत ६ लाख असून एकूण ९ लाख ७ हजार २०० रुपयाचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे.
११ अवैध दारू तस्कर पसार -
जिल्हा दारूबंदी घोषित झाल्यापासून गदगावमार्गे नागपूर जिल्ह्यातील अवैध दारू मोठ्या प्रमाणात तालुक्यात आणली जात आहे. अशाच प्रकारे स्कार्पियो गाडीतून दारूची वाहतूक होत असल्याची गोपनीय माहिती चिमूर पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारावर चिमूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार पोलीस निरीक्षक रविंद्र शिंदे पोलीस कर्मचाऱ्यांसह गदगाव मार्गावर दबा धरूण बसले होते. पहाटे तीन वाजताच्या सुमारास संशयित महिंद्रा स्कार्पिओ (एम एच ३५ एन 0५५४) येताना दिसली. मात्र पोलीस कारवाईची चाहुल तस्करांना लागल्याने चालकाने वेगात स्कॉर्पिओ एमआयडीसी परीसरात सोडून अंधाराचा फायदा घेऊन दारू तस्कर पसार झाला.
अवैध दारूसाठ्यासह महिंद्रा स्कॉर्पिओ जप्त -
पाठलाग करीत पोलीस स्कॉर्पियो जवळ पोहचले असता त्यात ३२ खोके ज्यात १,५३६ देशी दारूने भरलेल्या प्रत्येकी १८० मि.ली. च्या बाटल्या मिळाल्या. त्यांची किंमत ३ लाख ७ हजार २०० रुपये तसेच एक महिंद्रा स्कार्पिओ चारचाकी वाहन किंमत ६ लाख रुपये असा एकूण ९ लाख ७ हजार २०० रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. फरार चालक व मालकाविरुद्ध कलम 65(अ), 83 म.दा.का. नुसार गुन्हा नोंद करण्यात आला.