चिमूर (चंद्रपूर) - कोविड -१९ विषाणुंचा संसर्ग थांबविण्याकरता शासन, प्रशासन तथा आरोग्य विभागाकडून दिशा निर्देश देण्यात आले होते. त्यानुसार मास्क वापरणे, सार्वजनीक ठीकाणी थुंकणे, सोशल डिस्टन्स ठेवणे, याची अंमलबजावणी नागरीक करत नसल्यास त्यांच्यावर दंडात्मक कार्यवाही करण्याचे अधिकार नगर परीषदेला देण्यात आले होते. चिमूर नगर परिषदेने २३ एफ्रिल पासुन २१ आगस्टपर्यंत तब्बल २ लाख ५७ हजार ९०० रुपयांचा दंड वसुल केला.
जागतिक आरोग्य संघटनेच्या दिशा निर्देशा प्रमाणे कोविड-१९ विषांणुचा संसर्ग शिंक, खोकलणे, उघडयावर थुंकणे, गर्दी करणे व संसर्ग झालेल्याच्या संपर्काने होतो. त्यामूळे कोरोना विषाणुंचा प्रादुर्भाव रोखण्याकरता घराबाहेर निघताना मास्क लावणे, उघड्यावर थुंकु नये, गर्दी करू नये तथा प्रशासनाने निर्धारीत केलेल्या वेळेवर दुकान प्रतिष्ठाने उघडणे व वेळेवर बंद करण्या विषयी नियम बनवून त्याचे नागरिकांनी काटेकोर पणे पालन करण्याविषयीच्या सुचना प्रशासन तथा स्थानिक स्वराज्य संस्थाकडून वेळोवेळी देण्यात येते. मात्र, नागरिकांकडून अनेकदा जाणीवपुर्वक या नियमांचे उल्लंघन करण्यात येते.
जिल्हाधिकारी चंद्रपूर यांच्या आदेशा प्रमाणे आरोग्य विभाग तथा शासनाच्या दिशा निर्देशा प्रमाणे नियमांचे उल्लंघन करणाऱ्यावर चिमूर नगर परिषदेने दंडात्मक कार्यवाही केली. २४ एप्रिलपासून केलेल्या कार्यवाही प्रमाणे नगर परिषद क्षेत्रात मास्क न वापरणाऱ्या ७७५ नागरिकांवर दंडात्मक कार्यवाही करूण १ लाख ५५ हजार रुपये वसुल केले. सार्वजनीक ठिकाणी थुंकणाऱ्या २६ व्यंक्तीवर दंडात्मक कार्यवाही करून ३९०० रूपये वसुल केले. तर विना परवानगी दुकान सुरू करणे, सोशल डिस्टन्स व वेळेचे उल्लंघन करणाऱ्या दुकानदार व्यावसायिकांवर दंडात्मक कार्यवाहीद्वारे ९९ हजार रूपये वसुल करण्यात आले. असे एकुण २ लाख ५७ हजार ९०० रूपये दंडात्मक कार्यवाही करून वसुल केल्याची माहीती नगर परिषद अधिक्षक राकेश चौगुले यांनी दिली.