चंद्रपूर - कोरोनासारख्या आणीबाणीच्या काळात डॉक्टरांवर रुग्णांना प्रामाणिक सेवा देण्याची जबाबदारी असताना काही डॉक्टरांनी मात्र यात आपला 'धंदा' सुरू करण्याची संधी शोधली आहे, असेच काहीसे चित्र चंद्रपुरात आहे. जेवढी सामान्य रुग्णांची लूट केली जात आहे आहे, त्यानुसार 'धंदा' हा उल्लेख तेवढाच समर्पक आहे. 'ईटीव्ही भारत'च्या स्टिंग ऑपरेशनने याचे बिंग फुटले. शहरातील रेडिओलॉजिस्ट डॉक्टरांकडून चेस्ट सिटी स्कॅनच्या नावाने तब्बल तीन पट पैसे उकळले जात आहेत. एका तपासणीसाठी आठ हजार इतका हा दर आहे. पूर्वी हाच दर हा अडीच ते तीन हजारांच्या घरात होता. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी खासगी सिटी स्कॅनचा दर निश्चित करण्यासाठी समिती नेमण्याचे निर्देश दिले असताना चंद्रपुरात मात्र हा दर प्रत्येक डॉक्टर आपल्या मर्जीनुसार लावत आहेत आणि जिल्हा प्रशासन हातावर हात ठेवून सामान्य रुग्णाची लूट निमूटपणे बघत आहे.
डॉ. अनिल माडुरवार इंडियन मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष आहे. डॉक्टरांवरील अन्याय आणि वैद्यकीय क्षेत्रातील चुकीच्या कामावर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी त्यांची आहे. परंतु डॉ. माडुरवार यांनीच याला तिलांजली दिली. त्यांनीही सीटीस्कॅनच्या दरात सहा हजार रूपयांपर्यत वाढ केली. जटपुरा परिसरात डॉ. रवि अल्लूरवार यांचे केंद्र आहे. ते रूग्णांकडून चक्क आठ हजार रूपये सीटी स्कॅनचे घेतात. डॉ. अजय मेहरा रूग्णांकडून पाच हजार रूपये वसूल करीत आहे. एकाच चाचणीसाठी शहरात तिघेजण वेगवेगळे दर आकारत आहे. मात्र यावर नियंत्रण ठेवण्यासाठी कुठलेही कायदेशीर तरतूद नाही, असे महानगर पालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. अविष्कार खंडाळे यांनी सांगितले. कुणी तक्रार केली तर कारवाई करू. डॉक्टरांनी एकत्र बसून दर ठेवावे, असा सल्ला देत त्यांनी आपली जबाबदारी झटकली. विशेषत: म्हणजे एचआरसीटीची चाचणीसाठी देशभरातील कोणत्याही शहरात अडीच ते तीन हजार पाचशेच्यावर शुल्क आकारले जात नाही. मात्र चंद्रपुर अपवाद ठरला आहे. कोरोनाच्या संकटाला संधीत रूपांतरीत करण्याचा गोरखधंदा या डॉक्टरांनी सुरू केला. हे कोरोना रूग्णांच्या टाळूवरील लोणी खाण्याचा प्रकार असल्याच्या संतप्त प्रतिक्रीया जनमानसात उमटत आहे.
डॉक्टरांची टाळाटाळ -
याबाबत या सर्व रेडिओलॉजिस्ट डॉक्टरांशी संपर्क करण्यात आला. डॉ. अल्लुरवार यांनी आपल्या असिस्टंटकडे फोन देऊन आपली जबाबदारी झटकली. त्यांना अधिकृत प्रतिक्रियेसाठी विचारणा केली असता त्यांनी सहा तासांनी ती देतो असे सांगितले मात्र, यानंतर त्यांनी थेट नंबर ब्लॉक करून आपली जबाबदारी झटकली. डॉ. माडूरवार यांनी आपला आधीचा दर हा साडेपाच हजार होता, कोरोनानंतर कुणाला संसर्ग होऊ नये यासाठीच्या उपकरनांसाठी आपण पाचशे रुपये आगाऊचे लावत असल्याचे सांगितले. डॉ. मेहरा यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. मात्र, एकंदर हा प्रकार लक्षात आल्यावर हे डॉक्टर आपली जबाबदारी झटकण्यात धन्यता मानत आहेत.