मुंबई : राज्यातील काँग्रेसमधील वाद पुन्हा एकदा चव्हाट्य़ावर आला आहे. पदवीधर विधानसभेच्या निवडणुकीवेळी काँग्रेसमधील वाद सर्वांसमोर आला होता. या निवडणुकीच्या वेळी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात आणि महाराष्ट्र काँग्रेस अध्यक्ष नाना पटोले यांच्यात बिनसले होते. आता विजय वडेट्टीवार हे नाना पटोलेंवर नारज असल्याचे सांगितले जात आहे. इतकेच नाहीतर नानांविरोधात तक्रार करण्यासाठी वडेट्टीवार यांनी थेट दिल्ली गाठली असल्याचे सांगितले जात आहे.
दिल्ली दरबारी दाखल : काँग्रेसमधील अंतर्गत कलह परत एकदा चव्हाट्यावर आला आहे. नाना पटोले यांच्याविरोधात तक्रार करण्यासाठी विजय वडेट्टीवार हे दिल्लीला पोहोचले आहेत. चंद्रपूर जिल्ह्याचे मोठे शिष्टमंडळासह वडेवट्टीवार हे दिल्ली दरबारी गेले आहेत, यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. वडेट्टीवार यांनी नाना पटोले यांच्या कार्यपद्धतीवरच आक्षेप घेतला आहे. याप्रकरणी दिल्लीमध्ये वरिष्ठ स्तरावर हालचाली सुरू झाल्या आहेत. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे त्याचबरोबर काँग्रेस नेत्या सोनिया गांधी, नेते राहुल गांधी यांच्याशीही चर्चा करणार आहेत.
काय आहे नाराजीचे कारण : पटोले आणि वडेट्टीवार या दोन बड्या नेत्यांमध्ये वाद हा चंद्रपूर कृषी उत्पन्न बाजार समितीत झालेल्या आघाडीमुळे सुरू झाला आहे. बाजार समितीच्या स्थानिक पातळीवर प्रकाश देवतळे यांनी भाजपसोबत हात मिळवणी केली. याकारणामुळे नाना पटोले यांनी देवतळे यांच्यावर कारवाई केली. चंद्रपूरचे काँग्रेस जिल्हाध्यक्ष देवतळे यांची तडकाफडकी हकालपट्टी करण्यात आली. प्रकाश देवतळे यांच्याविरोधात करण्यात आलेल्या कारवाईविरोधात काँग्रेस गट आक्रमक झाला आहे. देवतळे हे विजय वडेट्टीवार यांच्या विश्वासातील आहेत. तसेच ते वडेट्टीवार यांचे कट्टर समर्थक मानले जातात. या कारणावरून वडेट्टीवार यांच्या नागपूर येथील घरी चंद्रपूरच्या पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. या बैठकीत नाना पटोलेंविरोधात हायकमांडकडे तक्रार करण्याचे ठरले
यापूर्वीही नाना विरोधात तक्रार : यापूर्वी सुद्धा नाशिक पदवीधर निवडणुकीच्यावेळी नाना पटोले यांच्याविरोधात बाळासाहेब थोरात यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली होती. कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीच्या तोंडावर नाना पटोले आणि ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्यामधील वाद विकोपाला गेला होता. त्याप्रसंगी बाळासाहेब थोरात यांनी गटनेतेपदाचा राजीनामाच पक्ष श्रेष्ठींकडे दिला होता. आताच झालेल्या कर्नाटक विजयानंतर पक्षामध्ये उत्साहाचं वातावरण आहे. अशात महाराष्ट्रातील नाना पटोले आणि विजय वडेट्टीवार यांच्यातील वाद पक्षासाठी डोकेदुखी ठरणार आहे.
हेही वाचा -