चंद्रपूर - तेलंगणा राज्यात हजारोंच्या संख्येने अडकलेल्या चंद्रपुरातील मजुरांना मोठा दिलासा मिळाला. सोमवारी सकाळी दहा वाजता या रेल्वे मजुरांना घेऊन तेलंगणा येथून चंद्रपूरलाआली. या मजुरांना आपल्या गावी पोचविण्याचे काम जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून स्वयंसेवी संस्था करीत आहेत.
तेलंगाणा राज्यात मिरची तोडण्यासाठी जिल्ह्यातील मजूर हजारोंच्या संख्येने गेले होते. मात्र, अचानक संचारबंदी लागली आणि ते तिथेच अडकले. त्यांना शेतातच दिवस घालवावे लागत होते. अतिशय बिकट परिस्थितीत ते जीवन जगत होते. त्यांना परत आणण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील होते. मात्र, हजारोंच्या संख्येने असलेल्या मजुरांना परत आणावे कसे? हा प्रश्न होता. अखेर यावर तोडगा निघाला.
तेलंगणा राज्यात अडकलेल्या मजुरांसाठी विशेष रेल्वे चालविण्यात आली. काल रात्री विजयवाडा येथून जिल्ह्यातील मजुरांना घेऊन ही रेल्वे आज चंद्रपुरात दाखल झाली. यामुळे या मजूर वर्गाला मोठा दिलासा मिळाला आहे. यावेळी उपविभागीय अधिकारी मनोहर गव्हाड आणि जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमणार यांनी परिस्थितीचा आढावा घेतला.