चंद्रपूर- जिल्ह्यामध्ये उन्हाळ्यात अनेक ठिकाणी पाणी टंचाई निर्माण होत असते. संपूर्ण जिल्हा टंचाईमुक्त व्हावा, यासाठी चंद्रपूर जिल्हा परिषदेने महत्वाचे पाऊल उचलले आहे. नव्याने बांधकाम होणाऱ्या प्रत्येक इमारतीला रेन वॉटर हार्वेस्टिंग करणे बंधनकारक करण्यात आले आहे. जिल्हा परिषदेअंतर्गत येणाऱ्या इमारतींमध्ये देखील ही व्यवस्था करण्यात येणार आहे. याबाबतचा ठराव नुकताच सर्वानुमते मंजूर करण्यात आला. रेन वॉटर हार्वेस्टिंगची अंमलबजावणी यशस्वी झाली तर संपूर्ण जिल्ह्यात पाण्याची टंचाई भासणार नाही, असे जिल्हा परिषद अध्यक्ष संध्या गुरनुले यांनी सांगितले.
जिल्ह्याच्या अनेक भागात उन्हाळ्यात पाणी टंचाईची झळ बसते. जमिनीतील पाण्याची पातळी खालावल्याने ही स्थिती निर्माण झाली आहे. यावर रेन वॉटर हार्वेस्टिंग हा सर्वात उत्तम पर्याय आहे. इमारतीमध्येच शोषखड्डा तयार करुन त्यात पावसाचे वाया जाणारे पाणी साचवले जाते. यामुळे जमिनीमधील पाण्याची पातळी वाढते. रेन वॉटर हार्वेस्टिंगचा सामूहिक प्रयत्न झाला तर संपूर्ण परिसर टंचाईमुक्त होऊ शकतो. हा पर्याय जिल्हा परिषदेने समोर ठेवला. जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष संध्या गुरनुले यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या सर्वसाधारण सभेत हा प्रस्ताव मांडला गेला. सर्व सदस्यांनी याचे स्वागत करत याला मंजुरी दिली आणि सर्वानुमते हा ठराव मंजूर करण्यात आला.
जिल्ह्यात नव्याने बांधकाम होणाऱ्या इमारतींना रेन वॉटर हार्वेस्टिंगची व्यवस्था करणे बंधनकारक असणार आहे. जिल्हा परिषदेच्या अंतर्गत येणाऱ्या स्थापित इमारतींना देखील ही व्यवस्था करण्यात येणार आहे. सध्या जिल्ह्यात 1,570 शाळा, 2,500 अंगणवाडी, 839 ग्रामपंचायत, 58 प्राथमिक आरोग्य केंद्र आणि 336 उपकेंद्र आहेत. या ठिकाणी ही प्रक्रिया राबविली जाणार आहे. यासाठी निधीची तरतूद करण्यात आली आहे, असे गुरनुले यांनी सांगितले.
कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा ऑनलाइन झाली. जिल्हा परिषदेच्या कक्षात अध्यक्ष संध्या गुरनुले, उपाध्यक्ष कारेकार, सभापती उरकुडे, गेडाम, गायकवाड, चौधरी, मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डीले यांची उपस्थिती होती. पंचायत समितीस्तरावर झुम अॅपची व्यवस्था करण्यात आली. तेथून सदस्य या बैठकीत सहभागी झाले होते.