चंद्रपूर - राज्याचे विरोधी पक्षनेते तसेच माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चंद्रपूर महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या वेळी शहर वायफाययुक्त करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, महानगरपालिकेवर भाजपची सत्ता आली असली तरी मात्र त्यांनी आपले आश्वासन पाळले नाही. त्यामुळे आता काँगेसचे खासदार बाळू धानोरकर यांनी आता शहर वायफाययुक्त निर्धार केला आहे. याबाबत यंत्रणेचा प्रस्ताव एक आठवड्यात सादर करण्याच्या संबधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या.
शुक्रवारी खासदार धानोरकर यांच्या अध्यक्षतेखाली दूरसंचार सल्लागार समितीसोबत बैठक घेण्यात आली. यावेळी बीएसएनएलचे महाप्रबंधक अरविंद पाटील, सह महाप्रबंधक वि. के. फाये, मंडळ अभियंता सचिन सरोदे, समिती सदस्य दिपक काटकोजवार, प्रवीण महाजन, आतिफ शब्बार अहमद कुरेशी उपस्थित होते. यावेळी धानोरकर यांनी चंद्रपूर जिल्ह्यातील बीएसएनएल विभागाचा आढावा घेतला. त्यामध्ये अनेक महत्वाच्या विषयावर चर्चा करण्यात आली. यापूर्वी बीएसएनएलच्या सेवेचे ग्राहकांवर अधिराज्य होते. मात्र मोदी सरकारने या कंपनीला रीतसर कमकुवत करण्याचा घाट घातला. आज मोबाईल नेटवर्क देणाऱ्या कंपन्याची सेवा ही 4जी, 5जी ची सुरू आहे. तर बीएसएनएलची सेवा ही 2जी आणि 3जी वरच आहे. आजही बीएसएनएलचे ग्राहक आहेत मात्र त्यांना अनेक समस्या येतात. अनेकदा तारा तुटल्याने सेवा खंडित होते. ही बाब लक्षात घेता, या तारा दर्शविणारे फलक लावण्यात याव्यात, अशी सूचना धानोरकर यांनी केली.
हेही वाचा - मालेगाव बॉम्बस्फोट: कर्नल पुरोहितची उच्च न्यायालयात धाव... खटला रद्द करण्याची याचिका दाखल
तसेच, चंद्रपूर शहराला वायफाययुक्त शहर बनविण्यासाठी बीएसएनएलने जबाबदारी घ्यावी असे सुचित केले. त्यासाठी लागणारे तंत्रज्ञान, व्यवस्था याचे योग्य नियोजन करावे आणि त्याचा प्रस्ताव एक आठवड्यात सादर करावे, अशी सूचना खासदार धानोरकर यांनी केली. फडणवीस यांनी आश्वासन दिले त्यानंतर त्यांच्याकडे आणखी चार वर्ष होती. मात्र, त्यांनी आपल्या पक्षाची सत्ता येऊनही याकडे कुठलेही लक्ष दिले नाही. त्यांनी त्यांचा शब्द पाळला नाही पण हा शब्द मी पूर्ण करणार आहे. असेही ते म्हणाले, तर, चंद्रपूर शहर हे वायफाययुक्त शहर हे करूनच दाखवेल असेही विश्वास त्यांनी व्यक्त केला.