चंद्रपुर - कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव देशात झपाट्याने होत आहे. जिल्ह्यातील विषाणूचा प्रसार आता समुदाय प्रादुर्भावाच्या उंबरठ्यावर आला आहे. त्यामुळे आता प्रत्येक व्यक्तीला कोणत्याही प्रकारचा मास्क वापरणे, सोशल डिस्टन्सिंग पाळणे बंधनकारक करण्यात आले आहे. मात्र, अनेकजण हा आदेश मानत नसल्याची बाब प्रकर्षाने जाणवत आहे. त्यामुळे जिल्ह्यात 'ऑपरेशन ऑल आऊट' ही मोहीम राबविण्यात येत असून शुक्रवारी पहिल्याच दिवशी तब्बल
2 लाखांचा दंड वसूल करण्यात आला आहे. जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यातही चंद्रपुरात ही संख्या अधिक असल्याने जिल्हा प्रशासनाने दहा दिवसांचा कडक लॉकडाऊन घोषित केला. 26 जुलैपर्यंत तो कायम असणार आहे. मात्र, लॉकडाऊन काळातही लोक बाहेर पडत आहेत. अनेक जण मास्कचा वापर करत नाहीत. तोंडावर कुठल्याही प्रकारचा मास्क न वापरणे स्वतःच्या आणि इतराच्या जीवितास धोका निर्माण करणारे आहे. त्यामुळे मास्क वापरणे आता बंधनकारक करण्यात आले आहे.
सोशल डिस्टन्सिंगचे उल्लघंन करणाऱ्यावर महानगरपालिकेकडून कारवाई करण्यात येत होती. आता यामध्ये पोलीस प्रशासनही उतरले आहे. 'ऑपरेशन ऑल आऊट' नावाने ही मोहीम राबविण्यात येत आहे. शुक्रवारी पहिल्याच दिवशी नियमांचे उल्लघंन करणाऱ्या नागरिकांकडून तब्बल दोन लाखांचा दंड वसुल करण्यात आला आहे.
मास्क न वापरणाऱ्या 745 केसेस दाखल करण्यात आल्या असुन 1 लाख 48 हजार इतका दंड वसुल करण्यात आला आहे. तसेच सोशल डिस्टन्सिंचे पालन न करणाऱयाविरोधात 54 केसेस दाखल करण्यात आल्या असुन 12 हजार 200 रुपये दंड वसुल करण्यात आला आहेत. तसेच इतर 225 केसेस करुन 46 हजार 700 रुपये दंड वसुल करण्यात आला. एकुण 1 हजार 24 प्रकरणात तब्बल 2 लाखांचा दंड वसूल करण्यात आला आहे. दुसऱ्यादा उल्लंघन झाल्यास अशावर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचा इशारा जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. माहेश्वर रेड्डी यांनी दिला आहे.