चंद्रपूर - राज्यात अनेक ठिकाणी कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याचे निदर्शनास येत आहे. याबाबत खबरदारी घेत आज शहर पोलिसांनी कारवाई सुरू केली. ज्यांनी मास्क लावले नाहीत अशांना दंड ठोठावण्यात आला. टाळेबंदी उठवल्यानंतर अशी पहिल्यांदाच मोहीम सुरू करण्यात आली आहे. अचानक वाहने रोखून कारवाई सुरू करण्यात आल्याने मास्क न घालणारे चांगलेच गोंधळून गेले. शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुधाकर अंभोरे यांच्या नेतृत्वात ही कारवाई करण्यात आली.
राज्यात कोरोनाची वाढती संख्या हा चिंतेचा विषय ठरला आहे. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीदेखील याबाबत चिंता व्यक्त करीत अशीच स्थिती राहिल्यास कडक निर्बंध लावण्याचा इशारा दिला. कोरोना रुग्ण आता नव्याने वाढू लागल्याचे चित्र राज्यात अनेक ठिकाणी दिसू लागल्याने चंद्रपूर पोलिसांनी निर्ढावलेल्या लोकांचे कासरे आवरायला आजपासून सुरुवात केली.
कोरोनाचे रुग्ण कमी झाल्यानंतर निष्काळजीपणा
गांधी चौकात एक मोहीम राबवत मास्क न घातलेल्या लोकांना दंड करण्याची ही मोहीम आहे. कोरोनाचे रुग्ण कमी झाल्यानंतर लोकांमध्ये बिनधास्तपणा आला होता. स्वतःच्या आणि दुसऱ्यांच्याही काळजीचा विसर त्यांना पडला. जणू काही कोरोना पूर्णपणे गेला, या अविर्भावात नागरिक सर्वत्र वावरू लागले होते. अशातच चंद्रपूर जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने कमी झाली होती. त्यामुळे बहुसंख्य लोक तोंडाला न बांधताचा बाहेर फिरू लागले. मात्र, आता पुन्हा एकदा या आजाराने डोके वर काढायला सुरुवात केल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी कोरोनाचे नियम काटेकोरपणे पाळण्याचे निर्देश दिले. त्यानुसार शहर पोलिसांनी आज गांधी चौकात मास्क न घातलेल्या लोकांवर कारवाईला सुरुवात केली. मास्क न घातल्यास दोनशे रुपये दंड केला जात आहे. कोरोनापासून बचाव करण्यासाठी नागरिकांनी मास्कचा वापर करावा आणि कारवाईपासूनही बचाव करावा, असे आवाहन पोलिसांनी केले.