चंद्रपूर - भुगार्भातील पाण्याची पातळी दिवासेंदिवस खालावत चालली आहे. जर ही स्थिती बदलायची असेल तर रेन वॉटर हार्वेस्टिंग शिवाय पर्याय नाही. याबाबत चंद्रपूर मनपा प्रशासनाने सक्तीचे पाऊल उचलले आहे. रेन वॉटर हार्वेस्टिंग करणे सर्वांना अनिवार्य करण्यात आले आहे. यासाठी पंधरा दिवसांची मुदत नागरिकांना दिली आहे. यानंतर यावर कारवाई करण्यास सुरुवात करण्यात येणार आहे. ज्या घरी रेन वॉटर हार्वेस्टिंग होणार नाही त्या घरमालकाला तब्बल 20 हजारांचा दंड ठोठावण्यात येणार आहे.
पुढच्या आठवड्यापासून होणार सर्व्हे - चंद्रपूर शहराची पाण्याची पातळी खालवली आहे. बोअरवेलच्या माध्यमातून पाण्याचा उपसा केला जातो, मात्र हे पाणी पुन्हा जमिनीत सोडण्याची काहीही प्रक्रिया नाही. रेन वॉटर हार्वेस्टिंग हा याला उत्तम पर्याय आहे. पावसाचे जे पाणी पडते ते जमिनीतच मुरविण्याचा हा उत्तम पर्याय आहे. त्यामुळे जे घर किंवा अपार्टमेंटमध्ये बोअरवेल किंवा विहीर आहेत त्यांनी आपल्या घरी रेन वॉटर हार्वेस्टिंग करण्याचे आवाहन मनपा प्रशासन मागील काही वर्षांपासून राबवीत आहेत. ईको प्रो संघटनेच्या माध्यमातून घरोघरी जाऊन जनजागृती करण्यात आली. मात्र ज्या प्रमाणात त्याचा परिणाम दिसायला हवा होता तो दिसला नाही त्यामुळे मनपाने आता आक्रमक भूमिका घेतली आहे. यासाठी मनपाने 15 दिवसांचा अल्टीमेटम दिला आहे, यानंतरही ही प्रक्रिया न केल्यास तब्बल 20 हजारांचा दंड ठोठावण्यात येणार आहे, या भीतीने नागरिक ही प्रक्रिया पूर्ण करणार अशी अपेक्षा मनपा प्रशासनाला आहे. मनपाकडून पुढच्या आठवड्यापासून सर्व्हेक्षणची मोहीम राबविण्यात येणार आहे. यात ज्यांनी ही प्रक्रिया केली नाही अशांना दंड ठोठावण्यात येणार आहे.
शहरात 20 हजार बोअरवेल - चंद्रपूर शहरात तब्बल 20 हजार बोअरवेल आहेत, त्यामाध्यमातून पाण्याचा मोठ्या प्रमाणात उपसा केला जातो, त्यामुळे भुगार्भातील पाण्याची पातळी खालवली आहे.
12 इमारतींचे डीपोजीट जप्त - ज्या नवीन इमारतीसाठी मनपाकडे परवानगी मागण्यात येते त्यांना रेन वॉटर हार्वेस्टिंगसाठी अतिरिक्त रक्कम जमा करणे अनिवार्य करण्यात आले आले, त्यांना विहित मुदतीत रेन वॉटर हार्वेस्टिंग करणे आवश्यक आहे, मात्र त्यांनी ही प्रक्रिया न राबविल्यामुळे 12 इमारतींचे डिपॉजिट जप्त करण्यात आले आहे.
17 हजार आस्थापनांना नोटीस - आत्तापर्यंत केवळ 850 इमारतींनी रेन वॉटर हार्वेस्टिंग करून घेतले आहेत, तर तब्बल 17 हजार इमारतींनी ही प्रक्रिया पूर्ण केली नाही. अशा मालकांना नोटीस देण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. मेसेज आणि इतर माध्यमातून ही नोटीस देण्याची प्रक्रिया सुरु केली आहे.
रेन वॉटर हार्वेस्टिंग ही काळाची गरज : अतिरिक्त आयुक्त - रेन वॉटर हार्वेस्टिंग करणे ही आता काळाची गरज झाली आहे. हजारो वर्षांपासून जे भुगार्भात साठलेले पाणी आहे, त्याचा उपसा आपण बोअरवेलने करतो, मात्र हे पाणी आपण परत खाली सोडत नाही. त्याला रेन वॉटर हार्वेस्टिंग हा उत्तम पर्याय आहे. नागरिकांनी ते करणे अनिवार्य करण्यात आले आहे, ज्यांना हे करण्यास मुदतवाढ हवी त्यांना आपण ही सुविधा देत आहोत, मात्र यानंतरही ही प्रक्रिया पूर्ण न झाल्यास दंडाची कारवाई केली जाईल, अशी प्रतिक्रिया अतिरिक्त आयुक्त विपीन पालिवाल यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना दिली.
हेही वाचा - Mumbai Corona Update : चाचण्या वाढताच रुग्णसंख्या वाढली, मुंबईत १७६५ नवे रुग्ण