चंद्रपूर - देशातील सर्वात मोठा राजकीय पक्ष म्हणून भाजपचा लौकिक आहे. मोठा पक्ष म्हटलं तर जबाबदारीही मोठी असते. मात्र, जिल्ह्यातील भाजपच्या वरीष्ठ पदाधिकाऱ्यांना याचा सपशेल विसर पडला आहे. कोरोनाच्या काळात सर्व नियम पायदळी तुडवून हे नेते अनेक कार्यक्रमात सहभागी होत आहेत, गर्दी करत आहेत, गर्दी जमवत आहेत. त्यांच्या तोंडावर कुठला मास्क नाही की फिजीकल डिस्टन्सिंगचे पालन नाही. भाजपचे जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे, मंगेश गुलवाडे, चंद्रपूर मनपाचे उपमहापौर राहुल पावडे, जिल्हा परिषद सदस्य ब्रिजभूषण पाझारे असे जबाबदार नेते स्वतः अशी कृती करत असतील तर सामान्य कार्यकर्त्यांकडून काय अपेक्षा करावी. विशेष म्हणजे अद्याप या नेत्यांवर कुठलीही दंडात्मक कारवाई झाली नाही. त्यामुळे नियम फक्त सामान्य नागरिकांनाच पाळायचा आहे का? असा सवाल आता उपस्थित केला जात आहे.
या नियम तोडण्याच्या उन्मादाचा पाया रचला तो भाजप युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष आणि जिल्हा परिषदेचे माजी समाजकल्याण सभापती ब्रिजभूषण पाझारे यांनी. 5 मेला कोरोनाच्या काळात देशातील सर्व धार्मिक स्थळे बंद असताना पाझारे यांनी राजकीय स्टंटबाजी करत नकोडा येथील श्रीराम जानकी मंदिर उघडायला लावले. त्यातही हास्यास्पद गोष्ट म्हणजे कोरोनापासून लोक सुरक्षित राहावे यासाठीची पूजा त्यांनी कोरोनाचे नियम तोडून केली. यानंतर 11 मे रोजी भाजपचे घुग्गुस शहराध्यक्ष विवेक बोढे यांचा जंगी वाढदिवस साजरा करण्यात आला. सकाळपासून रात्रीपर्यंत त्यांना भेटून शुभेच्छा देण्याचे सत्र सुरू होते. भाजप जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे, उपमहापौर राहुल पावडे यांनी देखील आवर्जून उपस्थिती लावली. याही वेळेस कोणी मास्क घालण्याच्या फंदात कोणी पडले नाही की कोणी फिजीकल डिस्टन्सिंगचे पालन केले.
यानंतर औचित्य होतं ते राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना पत्र पाठवण्याचे. पवार यांनी राम मंदिरावर केलेल्या टिपण्णीचा निषेध करण्यासाठी भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते पोस्ट ऑफिससमोर जमले. भाजयुमोचे जिल्हाध्यक्ष ब्रिजभूषण पाझारे आणि नुकतेच निवड झालेले जिल्हाध्यक्ष डॉ. मंगेश गुलवाडे उपस्थित होते. पोस्टकार्ड टाकल्यावर या आंदोलनाचे फोटोशूट करण्यात आले. त्यात सर्वांनी मास्क काढून फिजीकल डिस्टन्सिंगचा फज्जा उडवला. विशेष म्हणजे मंगेश गुलवाडे हे पेशाने डॉक्टर आहेत. इंडियन मेडिकल असोसिएशनया संघटनेमध्ये त्यांनी महत्वाची पदे भूषवली आहेत. मात्र, त्यांनाही या चमकोगिरीसमोर आपल्या जबाबदारीचे भान उरले नाही. विशेष म्हणजे यापूर्वी घुग्गुस पोलीस ठाण्यात घेतलेल्या एका कार्यक्रमात त्यांनी हाच प्रताप केला होता.
यानंतर भाजयुमोची जबाबदारी बघणारे जनता महाविद्यालयातील प्राध्यापक हेमंत उरकुडे यांचा जंगी वाढदिवस साजरा करण्यात आला. तब्बल पंधरा ते वीस केक कापून, आतिषबाजी करून, फटाके फोडून हा जल्लोश साजरा करण्यात आला. या रात्रीच्या कार्यक्रमात माजी जिल्हा परिषद अध्यक्ष आणि भाजपचे जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांनी आवर्जून उपस्थिती लावली. शेकडो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत हा जल्लोष साजरा करण्यात आला. यावेळी कोणीही मास्क घातले नव्हते. कोरोनाचे सर्व नियम यावेळी पायदळी तुडविण्यात आले.
यानंतर असाच शरद गेडाम नामक एका कार्यकर्त्याचा वाढदिवस साजरा करण्यासाठी लोक जमले होते, सर्व तयारी झाली. मात्र, असल्या नेत्यांच्या उन्मादाने त्रस्त झालेल्या नागरिकांनी पोलिसांना याची माहिती दिली आणि सर्वत्र पळापळ सुरू झाली. मात्र, कोणावरही कारवाई झाली नाही. यानंतर चंद्रपूर मनपाचे उपमहापौर राहुल पावडे दहावीत उत्तम यश मिळवलेल्या विद्यार्थीनीच्या घरी अभिनंदन करण्यासाठी गेले. तेव्हा त्यांनी कुठलाच मास्क घातला नव्हता.
एकूणच भाजपच्या जबाबदार पदाधिकाऱ्यांचा हा बेजबाबदारपणा अत्यंत संतापजनक आहे. जणू यांना कोरोनापासून बचावाचे संरक्षण कवच मिळाले आहे की कोणीही आपले काहीही बिघडवू शकत नाही हा त्यामागे असलेला अतिआत्मविश्वास आहे हे कळायला मार्ग नाही. एकूणच हे नेते आपल्यासह इतरांचा देखील जीव धोक्यात घालत आहेत.
पोलिसांनी केवळ आपली पाठ थोपटून घ्यायची का?
कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यावर जिल्हा पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. एकाच दिवशी तब्बल दोन लाखांचा दंड वसूल करण्यात आला. वारंवार नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर फौजदारी कारवाई देखील करण्यात येत आहे. मात्र, ही सर्व कामगिरी सामान्य नागरिकांवर कारवाई करून स्वतःची पाठ थोपटून घेण्यापूरती आहे आणि राजकीय नेत्यांना मात्र यातून अभय देण्यात आला आहे का? असा सवाल आता उपस्थित केला जात आहे. हा प्रश्न जिल्हा पोलीस प्रशासनाच्या कर्तव्यनिष्ठेवर संशय निर्माण करणारा आहे.