चंद्रपूर : चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष तसेच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते संतोषसिंग रावत यांच्यावर गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना गुरुवारी रात्री घडली. मूल येथे ते घरी परत जात असताना कारमधून आलेल्या अज्ञात हल्लेखोराने त्यांच्यावर गोळीबार केला. यात ते थोडक्यात बचावले आहेत.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते संतोषसिंग रावत यांच्यावर गोळीबार झाल्याने पोलिसांनी गांभीर्याने दखल घेतली आहे. याबाबत पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जिल्ह्यातील बड्या नेत्यावर हल्ला झाल्याने राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. हे हल्लेखोर कोण आणि त्यांनी रावत यांच्यावर जीवघेणा हल्ला का केला, याबाबत पोलीस तपास करत आहेत. सध्या मूल शहरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे.
चार हल्लेखोर होते-संतोषसिंग रावत हे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष आहेत. मूल येथे नुकत्याच पार पडलेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणूकित त्यांनी काँग्रेससाठी एकहाती सत्ता मिळवून दिली होती. मूल येथील जिल्हा बँकेच्या कार्यालयात बैठक पार पडल्यानंतर ते स्कुटीने घरी परत निघाले. मारुती स्विफ्ट या गाडी एमएच 34 6151 ने त्यांच्यावर पाळत ठेवत असणाऱ्या एकाने थेट रावत यांचा पाठलाग करत गोळीबार केला. गोळीबार केल्यानंतर त्वरित या वाहनातून धूम ठोकली. यात चार जण होते.
सीबीआय चौकशीची मागणी- अचानक गोळीबार झाल्याची घटना लक्षात येताच कार्यकर्त्यांनी वाहनाचा पाठलाग केला. मात्र हल्लेखोर पळून जाण्यात यशस्वी ठरले. यादरम्यान सुदैवाने रावत यांच्या हाताला गोळी चाटून गेली. कुठलीही गंभीर इजा त्यांना झाली नाही. मूल शहरात पहिल्यांदाच गोळीबाराची घटना घडली आहे. याची माहिती मिळताच काँग्रेस कार्यकर्त्यांनी रास्ता रोको आंदोलन करत याची सीबीआय चौकशीची मागणी केली आहे. पोलीस या अज्ञात हल्लेखोरांचा कसून तपास घेत आहेत. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी काँग्रेस नेत्यावरील हल्ल्याची गंभीर दखल घेतली आहे. हल्लेखोर आणि मास्टरमाइंड यांना त्वरित अटक करण्याची मागणी केली आहे. अन्यथा या विरोधात काँग्रेसकडून मोठे आंदोलन छेडण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.
हेही वाचा-
Jalna Crime: नवरा बायकोच्या भांडणात चिमुरडीचा गेला जीव; बापाने पाजले विष
Pune Crime : लोखंडी रॉडने भरलेल्या ट्रेलरवर दरोडा; गुन्हा नोंदविणे काम सुरू असतानाच दोघांना अटक
Cheating With Jeweler Owner: महिलेच्या आवाजात बोलून ज्वेलर्स मालकाची फसवणूक; दोन भामट्यांना अटक