चंद्रपूर - इच्छाशक्ती असेल तर कुठलीही गोष्ट अशक्य नाही. लॉकडाऊनच्या काळात सर्व शाळा बंद झाल्या आहेत. यामुळे अंतिम टप्प्यावर आलेल्या अभ्यासक्रमात अचानक खंड पडला. मात्र, चंद्रपूर महानगरपालिकेने यावर उत्तम तोडगा शोधून काढला आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी 'लर्निंग थ्रू व्हाट्सअॅप' ( Learning through Whats app) ही संकल्पना चंद्रपूर महानगरपालिकेच्या शालेय शिक्षकांकडून राबविली जात आहे. प्रत्येक वर्गशिक्षकाने आपल्या वर्गाचा व्हाट्सअॅप ग्रुप तयार करून त्यात विद्यार्थ्यांच्या पालकांचा समावेश करून घेतला आहे. दररोज विविध चाचण्या, प्रश्नसंच शिक्षकांद्वारे दिले जातात. त्यात पालकांच्या मदतीने विद्यार्थी घरून स्वंयअध्ययनाचा आनंद घेताहेत.
मार्च-एप्रिल हा शाळेतील परीक्षांचा काळ असतो. याच काळात विद्यार्थी सर्वात जास्त व्यस्त आणि आनंदी असतो. कारण आगामी उन्हाळी सुट्ट्यांची चाहूल त्यांना याच काळात लागते. बहुतांश शाळांचे नवीन शैक्षणिक वर्ष हे एप्रिल महिन्यातच सुरू होतात. यंदा मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाउनमुळे 15 मार्चपासूनच शाळांना अघोषित सुट्ट्या जाहीर झाल्याने विद्यार्थी, शिक्षक आणि शाळेचे नाते वर्षाच्या अंतिम टप्प्यावर येवून अपूर्णच राहिले. याच पार्श्वभूमीवर महापौर राखी कंचर्लावार व आयुक्त राजेश मोहिते यांच्या संकल्पनेतून 'लर्निंग थ्रू व्हाट्सअॅप ' ( Learning through Whats app) उपक्रम राबविला जात आहे. उपक्रम सुरू होण्यापूर्वी मनपा शिक्षणाधिकारी नागेश नीत यांनी फोनद्वारे संपर्क साधून मनपामार्फत सुरू करण्यात येत असलेल्या उपक्रमाविषयी माहिती पालकांना दिली. या काळात आपापल्या मुलांना मोबाईल देऊन कशाप्रकारे काळजी घ्यायची याविषयी चर्चा करून शाळेतील प्रत्येक वर्ग शिक्षकांना संपर्क साधायला सांगितला. वर्ग शिक्षकांनी आपापल्या वर्गाचे व्हाट्सअॅप ग्रुप बनवला आणि रोज नवीन अभ्यास करून घेऊन चाचणी सोडवून घ्यायला सुरुवात केली आहे. विशेष म्हणजे पालिकेकडून दिल्या गेलेल्या कोरोना विषयक जबाबदाऱ्या सांभाळून शिक्षक हे कार्य करीत आहेत.
इंग्रजी, मराठी विषयांचे साध्या शब्दांच्या जुळवणीपासून तर लेखन व वाचनाचा सराव चित्रफितीद्वारे घेण्यात येत आहे. कोडे सोडवणे, सामान्य ज्ञानाची चाचणी, गणितीय क्रिया, उद्बोधक गोष्टी या माध्यमातून विद्यार्थ्यांची तयारी करून घेणे सुरू आहे. यासाठी विद्यार्थी व पालकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. प्रत्येक पालक घरीच असल्यामुळे एखाद्या शिक्षकांना अभ्यास द्यायला उशिर झाल्यास विद्यार्थ्यांचे फोन येणे सुरू झाले आहे. शाळेला सुट्टी असूनही विद्यार्थ्यांची प्रगती पाहून पालक वर्ग खूप आनंदी आहेत. लॉकडाऊनच्या परिस्थितीत सर्व विद्यार्थ्यांना सहभागी करून विद्यार्थ्यांचे अभ्यास कौशल्य विकसित केले जात आहे. तसेच विविध विषयांचे ज्ञान आत्मसात करून देण्याचा मनपा शिक्षकांचा उपक्रम स्तुत्य असल्याने त्यांचे कौतुक केले जात आहे.