चंद्रपूर - महात्मा ज्येातीराव फुले शेतकरी योजनेतंर्गत निर्धारित अटी आणि शर्थीचे पालन करत योजनेची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याचे निर्देश, जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी दिले आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयात महात्मा ज्योतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजने संदर्भात बैठक घेण्यात आली. यामध्ये 1 मार्च 2015 ते 31 मार्च 2019 पर्यंत वाटप केलेल्या अल्पमुदत पीक कर्जाचे, पुनर्गठन किंवा फेरपुनर्गठन करुन मध्यम मुदत कर्जात रुपांतर केलेल्या कर्ज खात्यांना लाभ देण्याबाबत शासन निर्णय निर्गमित झालेला आहे. याची काटेकोर अंमलबजावणी जिल्ह्यात करण्यात यावी, असे जिल्हाधिकाऱ्यानी स्पष्ट केले आहे.
महात्मा ज्योतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 चा लाभ मिळणेकरिता पात्र शेतकऱ्यांचे बँक खाते आधार क्रमांकाशी संलग्न (Adhar Link) असणे बंधनकारक आहे. ज्या शेतकऱ्यांकडे आधार क्रमांक उपलब्ध नसेल त्यांनी त्वरीत आधार क्रमांक आपले सरकार केंद्राशी संपर्क करुन आधार कार्ड काढून घ्यावे. तसेच आपले बँक खाते आधार क्रमांकाशी संलग्न करुन घ्यावे.
हेही वाचा - शहरी नक्षलवाद्यांकडूनच सीएएचा विरोध - विनय तेंडुलकर
बँकाकडून शेतकऱ्यांचे कर्ज खात्यांची माहिती 1 फेब्रुवारीपासून संबंधित पोर्टलवर अपलोड करण्यात येणार आहे. पात्र शेतकऱ्यांच्या कर्ज खाती कर्जमुक्तीची रक्कम थेट जमा होणार आहे. यामुळे यासंबंधाने शेतकऱ्यांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. तसेच त्रयस्थ व्यक्तींशी याविषयासंबंधाने संपर्क करु नये, असे आवाहन करण्यात आले आहे. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले, शिखर बँकेचे व्यवस्थापक शंभुनाथ झा, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी उदय पाटील, जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था पी.एस. धोटे आणि निवासी उपजिल्हाधिकारी घनश्याम भुगावकर उपस्थित होते.