चंद्रपूर: चंद्रपूर शहर हे इंग्रज कालीन भूमिगत कोळसा खाणीने वेढलेला आहे. इंग्रजांच्या काळात सुरू झालेल्या अनेक कोळसा खाणी सुरू आहेत तर काही बंद करण्यात आल्या आहेत. मात्र ज्या बंद झालेल्या खाणी आहेत त्या अजूनही भरण्यात आलेल्या नाहीत. चंद्रपूर शहर हे भूकंपप्रवण क्षेत्राच्या झोन 3 च्या वर्गवारीत येतो. अशावेळी भूकंप आल्यास मोठी हानी होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
भूकंप सदृश्य कंपन: यंदाच्या पावसाळ्यात घुगुस येथे अचानक एक घर जमिनीखाली गेले आणि तिथे एक भूमिगत कोळसा खाण असल्याचे समोर आले होते. अशावेळी आजूबाजूच्या घरांना खाली करण्यात आले, मात्र, या लोकांचे अद्याप पुनर्वसन झालेले नाही. तर याच दरम्यान चंद्रपूर शहराच्या भूभागात काही दिवसांपूर्वी भूकंप सदृश कंपन होत होते. हे कंपन भूगर्भातील होणाऱ्या हालचालीमुळे होत असल्याचे समोर आले आहे.
चंद्रपूर भूकंपप्रवण क्षेत्र: जमिनीखाली भूमिगत कोळसा खाणी आहेत, त्यातील पोकळ झालेल्या बोगद्याचा भाग कोसळल्याने हे कंपन होत आहे. अशावेळी भूकंप आल्यास धोक्याची घंटा असू शकते. मात्र सुदैवाने चंद्रपूर शहर हे भूकंपप्रवण क्षेत्राच्या तीन वर्गात येते. अशा ठिकाणी भूकंप होण्याचा धोका कमी असतो मात्र तो नसतोच असा नाही. त्यामुळे चंद्रपूर शहरातील भूमिगत कोळसा खाणी ह्या हे आपत्कालीन स्थितीत एक मोठे आव्हान म्हणून उभ्या ठाकल्या आहेत.
प्रशासनाने नियोजन करणे आवश्यक: चंद्रपूर शहरात लालपेठ, रयतवारी, बाबूपेठ येथे भूमिगत कोळसाखानी आहेत. इंग्रजकाळापासून त्या सुरू आहेत आणि तिथून कोळशाचे उत्खनन देखील सुरू आहे. मात्र काही खाणी या अंतिम टप्प्यात असून जवळपास बंद होण्याच्या मार्गावर आहे. जमिनीतून पोखरून हा कोळसा तांत्रिकदृष्ट्या काढला जातो. मात्र ही खाण बंद झाल्यानंतर त्या सर्व बोगद्यांना वाळूच्या माध्यमातून बुजवणे आवश्यक आहे. मात्र तसे झाले नाही असे सकृतदर्शनी दिसून येते. याबाबत भूगर्भ अभ्यासक देखील सहमत आहेत. भूगर्भ अभ्यासक प्राध्यापक सुरेश चोपणे यांच्यानुसार भूमिगत कोळशाखानी आणि भूकंपप्रवण पट्टा या दोन्ही गोष्टी मिळून एक चिंतेचे कारण बनते असे त्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे प्रशासनाने भविष्यातील धोका लक्षात घेता याबाबत नियोजन करणे आवश्यक असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. पण सध्यातरी चंद्रपूर शहराला भूकंपाचा खूप मोठा धोका असे देखील म्हणता येणार नाही, असेही ते म्हणाले.